प्राथमिक शिक्षकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने आपल्या सदस्यांसाठी ‘क्लीन कॅश क्रेडिट कर्ज’ ही नवी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शिक्षक सदस्यांना विनातारण तब्बल १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन वसंत केनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या योजनेची घोषणा करण्यात आली. यावेळी चेअरमन सौ वर्षाताई केनवडे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून सभासदांचा विश्वासही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांना सुलभ कर्जपुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्यानुसार, सभासदांची कर्जमर्यादा ५० लाखांपर्यंत करण्यात आली आहे. पूर्वी ८ लाख रुपयांपर्यंत ‘क्लीन कॅश’ कर्ज दिले जात होते; मात्र आता ही मर्यादा वाढवून १० लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या कर्जावर सुमारे ८ टक्के व्याजदर आकारला जाणार असून, इतर कर्जांच्या तुलनेत तो स्पर्धात्मक असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
योजनेअंतर्गत कर्ज घेताना कोणत्याही प्रकारचे तारण देण्याची गरज नाही. तसेच, सदस्यांच्या खात्यातील व्यवहारांच्या आधारे कर्ज मंजूर केले जाणार आहे. यामुळे शिक्षकांना तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे.
शैक्षणिक तसेच उच्च शिक्षणासाठी फी भरणे, वैद्यकीय खर्च किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी हे कर्ज उपयुक्त ठरणार असल्याचेही बँकेने नमूद केले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ सभासदांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन केनवडे यांनी केले.