सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाखेच्या लॉकरवर विसरलेले सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीच्या वस्तू संबंधित लॉकरधारकास सुरक्षितपणे परत करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेतील अधिकारी सौ. सुजाता महेंद्र तुपे या नेहमीप्रमाणे शाखेत लॉकर कप्पा उघडण्यासाठी गेल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या घरी निघून गेल्या. त्यानंतर दुपारी कामानिमित्त शाखेचे सेवक श्री.अनिल पवार लॉकरजवळ गेले असता त्यांना लॉकरवर एक पिशवी ठेवलेली दिसली.
पवार यांनी तत्काळ शाखाप्रमुख श्री.विवेक मोरे आणि कॅशियर सौ.रुपाली लावंड यांना माहिती दिली. पिशवीच्या बाहेरून तिच्यात काय आहे, याची माहिती मिळत नसल्याने शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पिशवी उघडण्यात आली. त्यातील कापडी पिशवीवर असलेल्या नावावरून शाखाप्रमुख विवेक मोरे यांनी सौ.सुजाता तुपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाखेत बोलावून घेतले.
शाखेतील सेवक श्री.अक्षय बोबडे, सौ.सुप्रिया देशमुख आणि कु.प्रज्ञा आगुंडे यांच्या उपस्थितीत सौ.तुपे यांनी पिशवीमध्ये त्यांचे सोन्याचे दागिने तसेच मुलांच्या आणि पतीच्या चांदीच्या वस्तू असल्याचे सांगितले. सर्वांच्या उपस्थितीत पिशवी उघडली असता त्यांनी सांगितलेल्या सर्व वस्तू त्यामध्ये आढळून आल्या.
आपले मौल्यवान दागिने आणि चांदीच्या वस्तू सुरक्षितपणे परत मिळाल्याने सौ.तुपे यांना सुखद धक्का बसला. लाखो रुपयांचे दागिने कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांनी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
या घटनेची माहिती जिल्हा परिषद परिसरात पसरताच शाखेतील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.राजू भैय्या भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे विशेष कौतुक केले. जिल्हा परिषद सदस्य श्री.अजित साळुंखे यांनीही शाखेतील कर्मचाऱ्यांच्या विनम्र, तत्पर आणि प्रामाणिक सेवेचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते श्री.अनिल पवार व अन्य सेवकांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, यापूर्वी २०२० मध्ये श्री.विवेक मोरे हे परळी शाखेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी एका आरोग्य सेवकाचे एटीएम कार्डच्या आधारे पाकीट शोधून काढले होते. त्यातील रोख रकमेसह पाकीट त्यांनी संबंधित व्यक्तीला परत केले होते.
सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिल्हा परिषद शाखेतील सर्व सेवकांचे कौतुक केले. सातारच्या मातीशी जोडलेली नाळ, जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा ध्यास आणि विनम्र, तत्पर व प्रामाणिक सेवा हीच सातारा जिल्हा बँकेची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेचे सरव्यवस्थापक श्री.राजीव गाढवे, श्री.राजेंद्र भिलारे तसेच सर्व अधिकारी वर्गानेही शाखेतील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील विश्वास, प्रामाणिकपणा आणि ग्राहकसेवेचे आदर्श उदाहरण समोर आले आहे.