

सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. एका बाजूला बँकेने गतवर्षीच्या तुलनेत व्यवसायात मोठी झेप घेतल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला, तर दुसऱ्या बाजूला बँकेतील 'नोकरमस्ती' (कर्मचाऱ्यांची अरेरावी) व इतर प्रलंबित विषयांवरून स्वाभिमानी परिवर्तन आघाडीच्या वतीने विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या दोन्ही बाजूंमुळे ही वार्षिक सभा चांगलीच चर्चेत राहिली.
सभेचे अध्यक्षपद भूषवताना बँकेचे चेअरमन विजय ढमाळ यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. "सभासदांचा विश्वास आणि सहकार्य हेच शिक्षक बँकेच्या प्रगतीचे खरे बळ आहे," असे सांगत त्यांनी निष्क्रिय सभासदांना पुन्हा बँकेच्या प्रवाहात आणण्यासाठी संचालक मंडळाने घेतलेल्या धाडसी निर्णयांची माहिती दिली.
बँकेने सुरू केलेल्या 'अभिनव कर्ज योजने' अंतर्गत अवघ्या ८.६५ टक्के व्याजदराने २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेत आतापर्यंत सुमारे ६२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, यामुळे निष्क्रिय सभासद पुन्हा बँकेशी जोडले गेले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या आर्थिक ताळेबंदात लक्षणीय सुधारणा झाली आहे. ३१ मार्च अखेर बँकेच्या ठेवींमध्ये ३५.७१ कोटी रुपयांची, कर्जवाटपात ३०.५७ कोटी रुपयांची आणि गुंतवणुकीत १६.४१ कोटी रुपयांची भरीव वाढ झाली आहे. या वाढीसह ३१ मार्चअखेर बँकेच्या एकूण ठेवी ७३५ कोटी रुपयांवर, एकूण कर्जवाटप ४८९ कोटी रुपयांवर, तर गुंतवणूक ३२४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच बँकेचे एकूण खेळते भांडवल ८६४ कोटी रुपयांवर पोहोचले असून बँकेने आर्थिक क्षेत्रात मजबूत घोडदौड केली असल्याचे चेअरमन ढमाळ यांनी स्पष्ट केले.
शिक्षक बँकेने केवळ व्यावसायिक उद्दिष्टे न ठेवता सामाजिक आणि कल्याणकारी योजनांमध्येही आघाडी घेतली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध मदत निधीच्या माध्यमातून मयत सभासदांच्या वारसांना एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच आजारपणासाठी १५२ सभासदांना १४ लाख ७७ हजार रुपयांची मदत करण्यात आली. सभासदांच्या आरोग्याची काळजी घेत संचालक मंडळाने वैद्यकीय मदतीची मर्यादा ५० हजार रुपयांवरून थेट ७५ हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या सभेत जाहीर केला.
सभा जरी खेळीमेळीत पार पडली असली, तरी बँकेतील 'नोकरमस्ती' (कर्मचाऱ्यांची अरेरावी) आणि विविध प्रशासकीय त्रुटींचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हातात बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या भूमिकेमुळे काही काळ सभेत राजकीय वातावरण तापले होते.
या महत्त्वपूर्ण सभेस बँकेचे व्हाईस चेअरमन नितीन फरांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले, शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, दीपक भुजबळ, मच्छिंद्र मुळीक, बापू लावंड, विश्वंभर ननावरे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच संचालक ज्ञानबा ढापरे, नितीन काळे, किरण यादव, पुष्पलता बोबडे, निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने बँकेचे सभासद उपस्थित होते.