डिजिटल अरेस्टची भीती! १.३९ कोटींच्या फसवणुकीचा गंडा 
Co-op Banks

डिजिटल अरेस्टची भीती! १.३९ कोटींच्या फसवणुकीचा गंडा

खोट्या सीबीआय अधिकाऱ्याचा फोन आणि मोठी आर्थिक फसवणूक

Prachi Tadakhe

सातारा जिल्ह्यातील चितळी (ता. खटाव) येथे सायबर फसवणुकीची गंभीर घटना घडली आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे खोटे सांगून, डिजिटल अटकेची भीती दाखवत, वेगवेगळ्या बँक खात्यांवरून तब्बल १ कोटी ३९ लाख ५० हजार रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांनी फसवणुकीद्वारे काढून घेतली.

यामध्ये कृषी संशोधक मालोजीराव नामदेव पवार (वय ७४, रा. चितळी, ता. खटाव) यांना लक्ष्य केले गेले. भामट्यांनी त्यांना गंडा घातला आणि फसवणुकीद्वारे मोठी रक्कम हडपली. सातारा सायबर पोलिसांनी घटनास्थळी तपास करून आतापर्यंत मूळ रकमेतील ६ लाख रुपये हस्तगत केले आहेत.

ही घटना १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. पीडित मालोजीराव पवार यांना अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. फोनवरील संशयिताने सांगितले की, "मी टेलिकॉम सर्व्हिसमधून बोलतोय. तुमचा मोबाईल क्रमांक व आधार कार्ड ब्लॉक केले जाईल. तुमच्या आधार कार्डचा संदीप कुमार या नावाच्या व्यक्तीने गैरवापर करून एका बँकेत अकाऊंट उघडले असून त्यावर ८ कोटींचे व्यवहार झाले आहेत."

यानंतर दुसऱ्या फोनमध्ये प्रदीप सिंग यांनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले आणि मालोजीराव पवार यांना फसवण्यासाठी विविध तंत्रांचा वापर केला. संशयितांनी पीडितास घाबरवून त्यांचे बँक खात्यांतील पैसे वेगळ्या खात्यांवर हस्तांतरित करण्यास भाग पाडले.

सातारा सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून, फसवणुकीच्या गुन्ह्यातील सर्व संशयितांना पकडण्यासाठी विविध डिजिटल तंत्रांचा वापर केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या सायबर फसवणूक फोन कॉल्स बाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

SCROLL FOR NEXT