मिरज: ग्राहकांना अधिक आधुनिक, गतीमान आणि सुरक्षित बँकिंग सेवा पुरवण्याच्या उद्देशाने सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., म. गांधी चौक (मिरज) शाखेचा नूतनीकरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. नूतनीकरण केलेल्या शाखेचे उद्घाटन माजी कामगार मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या शुभहस्ते पार पडले, तर रा.स्व.संघाचे सांगली जिल्हा संघचालक सुधीरजी चापोरकर यांच्या हस्ते बँकेच्या विस्तारित लॉकर स्ट्राँगरूमचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे संस्थापक स्वर्गीय म. ह. तथा अण्णा गोडबोले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
ग्राहकांचा विश्वास हीच बँकेची खरी ताकद - संजय धामणगांवकर
प्रास्ताविक करताना शाखेचे पालक संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य संजय धामणगांवकर यांनी गांधी चौक शाखेच्या ४० वर्षांच्या यशस्वी सेवापरंपरेचा आढावा घेतला. "ग्राहकांचा दृढ विश्वास हीच बँकेची खरी ताकद आहे. modern सुविधा, सुरक्षित लॉकर सेवा आणि ग्राहकाभिमुख बँकिंगच्या माध्यमातून अधिक सक्षम सेवा देण्याचा बँकेचा संकल्प आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, लॉकरधारक आणि माजी कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अशोक कुलकर्णी, उद्योजक सतीश इंगवले, डॉ. रामचंद्र जोशी, उद्योजक सतीश केरीपाळे, अवधूत नातू, अनिकेत कोरे, संतोष हिरेमठ, यश निशांत तिवारे, धनंजय दिवेकर, सौ. गीता पाटील, सौ. सुलभा कुलकर्णी, आर्किटेक्ट सचिन साळुंखे, कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअर निखिल माळी तसेच बँकेचे माजी शाखाधिकारी विश्राम आजगांवकर व सौ. रेखा कुलकर्णी यांचा समावेश होता.
यावेळी डॉ. अशोक कुलकर्णी, उद्योजक सतीश इंगवले आणि ज्येष्ठ खातेदार डॉ. रामचंद्र जोशी यांनी बँकेच्या पारदर्शक व विश्वासार्ह सेवांचे कौतुक करत बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सहकार संस्थांची भूमिका महत्त्वाची - सुधीर चापोरकर
मार्गदर्शन करताना रा.स्व.संघाचे सांगली जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि स्वदेशी जीवनमूल्ये या पंचपरिवर्तनाच्या विषयांवर प्रकाश टाकला. समाजपरिवर्तनामध्ये सहकार संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
सांगली अर्बन बँकेला भक्कम पाठबळ राहील - आमदार डॉ. सुरेश खाडे
आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी सांगली अर्बन बँकेच्या प्रगतीचा आणि संचालक मंडळाच्या दूरदृष्टीचा गौरव केला. "शाखेचे नूतनीकरण आणि विस्तारित लॉकर सुविधा हे ग्राहकांच्या हितासाठी उचललेले अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. बँकेच्या पुढील विकासासाठी माझे भक्कम पाठबळ नेहमीच राहील," अशी ग्वाही त्यांनी दिली.
बँकेचे अध्यक्ष सी.ए. श्रीपाद खिरे यांनी बँक सदैव पारदर्शक कारभाराला प्राधान्य देत असल्याचे सांगितले, तर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांनी सर्व सभासद व खातेदारांचे आभार मानले.
या सोहळ्यास बँकेचे उपाध्यक्ष संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, ज्येष्ठ संचालक अनंत मानवी, हणमंतराव पाटील, सागर घोंगडे, स्वाती करंदीकर, मनोज कोरडे, ॲड. रणजित चव्हाण, कालिदास हरिदास, रवींद्र भाकरे, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, वरिष्ठ अधिकारी तसेच शाखा सल्लागार सुहास दिवेकर, प्रसन्न देशपांडे, तानाजीराव ओमासे व राजू शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत येडूरकर यांनी केले, तर आभार शाखाधिकारी विनोद देशमुख यांनी मानले.