यशाचं कौतुक, भविष्याचं पाऊल! सांगली अर्बन बँकेचा 'स्नेहमेळावा' उत्साहात संपन्न

सांगलीत रंगला कर्मचारी स्नेहसंवर्धन मेळावा; सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंगवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
Sangli Urban Co operative Bank News
'बदलते बँकिंग' आणि 'सायबर सिक्युरिटी'चे धडे देत बँक कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.
Published on

सांगली: बँकिंग क्षेत्रातील बदलती आव्हाने पेलत असतानाच, कर्मचाऱ्यांमधील सुसंवाद आणि ऊर्जा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने सांगली अर्बन को-ऑप. बँकेचा वार्षिक कर्मचारी स्नेहसंवर्धन मेळावा रविवारी (दि. १४ जून) सांगली येथील खरे क्लब हाऊस येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात बँकेच्या महाराष्ट्रभरातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. तसेच आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात बँकेचे संस्थापक स्व. म. ह. तथा अण्णा गोडबोले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) उल्हास नायक यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात बँकेच्या सद्यस्थितीचा आढावा घेत मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

Sangli Urban Bank employee meet
सांगली अर्बन बँक: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांचा गौरव; मेळावा उत्साहात संपन्न

बदलते बँकिंग आणि सायबर सुरक्षेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बँकिंग क्षेत्रात वेगाने होणारे डिजिटल बदल लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी या मेळाव्यात विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

  • बदलते बँकिंग: व्यवस्थापन मंडळ सदस्य जयंत काकतकर यांनी ‘बदलते बँकिंग’ या विषयावर मार्गदर्शन करताना, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून ग्राहकांना गतीने सेवा देण्याचे आवाहन केले.

  • सायबर सिक्युरिटी: आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ संचालक विश्वास चितळे यांनी ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करून बँकेची प्रणाली आणि ग्राहकांचा डेटा कसा सुरक्षित ठेवावा, याचे महत्त्वपूर्ण धडे दिले.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ठेवी (Deposits), कर्जे (Loans), शेअर्स आणि विमा (Insurance) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून बँकेचे व्यावसायिक उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या शाखा आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

बँकेचे अध्यक्ष सी. ए. श्रीपाद खिरे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक व संचालक मंडळाच्या हस्ते यशस्वी शाखांना बक्षीस, प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्काराने कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.

व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मा. गणेशराव गाडगीळ आणि बँकेचे अध्यक्ष सी. ए. श्रीपाद खिरे यांनी उपस्थित कर्मचारी वर्गाला संबोधित करताना, बँकेच्या प्रगतीत प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत पुढील आर्थिक वर्षात बँक नव्या उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला. पुरस्काराला उत्तर देताना विविध शाखांचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत बँकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या स्नेहसंवर्धन मेळाव्याला बँकेच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई आणि मराठवाडा येथील सर्व शाखांचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेचे संचालक सी. ए. अनंत मानवी, एच. वाय. पाटील, संजय धामणगावकर, शैलेंद्र तेलंग, सागर घोंगडे, सतीश मालू, कालिदास हरिदास, रवींद्र भाकरे, सौ. अश्विनी आठवले, सौ. स्वाती करंदीकर, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर आदी पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप संचालक संजय धामणगावकर यांनी आभारप्रदर्शनाने केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रसिद्धी अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी केले. अत्यंत कौटुंबिक आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

Banco News
www.banco.news