सांगली अर्बन बँक: सीईओ उल्हास नायक यांना नोव्हेंबर २०३० पर्यंत मुदतवाढ 
Co-op Banks

सांगली अर्बन बँकेच्या CEO पदासाठी उल्हास नायक यांना २०३० पर्यंत मुदतवाढ

बँकेची वित्तीय शिस्त, ऑडिटचा 'अ' वर्ग दर्जा आणि २३०० कोटींच्या व्यवसायाची यशस्वी वाटचाल विचारात घेऊन रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Prachi Tadakhe

सांगली: सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगलीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. उल्हास विठ्ठल नायक यांच्या पुन:र्नेमणुकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अधिकृत मान्यता दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार श्री. नायक यांची माहे नोव्हेंबर २०३० अखेर पुन:र्नेमणूक मंजूर करण्यात आली आहे. बँकेची आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि गेल्या ११ वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन मध्यवर्ती बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार आणि बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नियमांनुसार सहकारी बँकेच्या सीईओ पदासाठी "Fit & Proper Criteria" (योग्य व पात्र व्यक्ती निकष) लागू केले जातात. श्री. नायक हे गेल्या ११ वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांची यापूर्वीची ५ वर्षांची मुदत नोव्हेंबर २०२६ मध्ये संपत होती. त्या पार्श्वभूमीवर बँकेने पाठविलेल्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून, बँकेचा परफॉर्मन्स व आर्थिक ताळेबंद विचारात घेऊन रिझर्व्ह बँकेने पुढील ५ वर्षांसाठी (नोव्हेंबर २०३० पर्यंत) त्यांच्या नियुक्तीस हिरवा कंदील दाखवला आहे.

बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नवीन तरतुदींनुसार १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले संचालक अपात्र ठरणार आहेत. अशा परिस्थितीत बँकेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत स्थैर्य राखणे आणि व्यवसायवाढीचा वेग कायम ठेवणे यासाठी श्री. नायक यांची ही पुन:र्नेमणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

श्री. उल्हास नायक यांना बँकिंग क्षेत्रातील तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. परिवर्तन पॅनेल सत्तेवर आल्यानंतर मा. गणेशराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आणि श्री. नायक यांच्या कुशल प्रशासकीय नियोजनातून बँकेने सर्व क्षेत्रांत मोलाची प्रगती साध्य केली आहे.

संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या उत्कृष्ट समन्वयातून बँकेने जुना सर्व संचित तोटा पूर्णपणे निरंक केला आहे. तसेच बँकेने सलग ऑडिटचा 'अ' वर्ग दर्जा प्राप्त केला असून भागधारक सभासदांना लाभांश (Dividend) वितरित केला आहे. आर्थिक वर्ष मार्च २०२६ अखेर बँकेने रु. २,३०० कोटींपेक्षा जास्त व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.

श्री. नायक यांच्या अनुभवाचा फायदा केवळ सांगली अर्बन बँकेपुरता मर्यादित नसून, सांगली जिल्हा सहकारी नागरी बँक्स असोसिएशन लि., सांगलीच्या नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळात त्यांची 'तज्ज्ञ संचालक' (Expert Director) म्हणून नुकतीच निवड झाली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील २० नागरी सहकारी बँकांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे मार्गदर्शन मिळत आहे.

"रिझर्व्ह बँकेने दिलेली ही मंजूरी केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून बँकेने मा. गणेशराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाने राबविलेले धोरण, ११ वर्षांतील यशस्वी वाटचाल आणि वित्तीय शिस्तीला मिळालेली ही पोचपावती आहे." - बँक व्यवस्थापन

रिझर्व्ह बँकेकडून मुदतवाढीची मान्यता मिळाल्यानंतर सांगली अर्बन बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बँकेचे अध्यक्ष सीए. श्रीपाद खिरे यांच्या हस्ते श्री. उल्हास नायक यांचा सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल बँकेचे सभासद, ग्राहक, आणि कर्मचारी वर्गाकडून श्री. नायक यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. या मुदतवाढीमुळे बँकेच्या आगामी काळातील वाटचालीला मोठे स्थैर्य लाभले असून बँक अधिक गतीने प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

SCROLL FOR NEXT