जबाबदार कर्ज मोहीम 
Co-op Banks

लहान कर्जदारांसाठी ‘जबाबदार कर्ज मोहीम’

आर्थिक शिस्त, वेळेवर परतफेड आणि क्रेडिट स्कोअरबाबत तरुणांमध्ये जागरूकता

Vijay Chavan

नवी दिल्ली : लहान कर्जदारांनी विवेकपूर्ण पद्धतीने कर्ज घ्यावे आणि वेळेवर परतफेड करावी, यासाठी बँका व क्रेडिट माहिती कंपन्या ‘जबाबदार कर्ज मोहीम’ राबविण्याच्या तयारीत आहेत. डिजिटल कर्जपुरवठ्याचा वाढता वापर आणि फसव्या कर्ज ॲप्समुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन या मोहिमेत तरुण कर्जदारांमध्ये आर्थिक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) वित्तीय स्थिरता अहवालानुसार, २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीपासून २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत सलग नऊ तिमाहींमध्ये ₹५ ते ₹१० लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कर्जदारांकडून नवीन एनपीएमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर बँका कर्जदारांना क्रेडिट हिस्ट्री सुधारण्याचे, कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याचे आणि विविध आर्थिक साधनांचा योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, सायबर सुरक्षा आणि फसव्या कर्ज ॲप्सपासून बचाव याबाबतही माहिती दिली जाणार आहे.

छोट्या कर्जांमध्ये फिनटेकचा मोठा वाटा

आरबीआयच्या जून २०२६ मधील अहवालानुसार, मार्च २०२६ पर्यंत ₹५०,००० पर्यंतच्या लहान वैयक्तिक कर्जांमध्ये फिनटेक कंपन्यांचा वाटा ५६.८ टक्के झाला आहे. या कर्जांमधील थकबाकीचे प्रमाण मार्च २०२४ मधील ४.१ टक्क्यांवरून मार्च २०२६ मध्ये ६.४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

तरुण वर्ग कर्जाच्या गरजांसाठी फिनटेक प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याने डिजिटल कर्जाशी संबंधित जोखीम आणि जबाबदार कर्जवापराबाबत जागरूकता वाढविणे आवश्यक असल्याचे बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

'बँकिंग फॉर यूथ’वरही भर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांमध्ये चांगला क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री राखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन बँकांना केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २ ऑक्टोबरपासून ‘बँकिंग फॉर यूथ’ ही महिनाभराची मोहीम राबविण्याचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

या मोहिमेत १६ वर्षे व त्यावरील तरुणांपर्यंत पोहोचण्यावर भर राहणार असून, केवळ खाते उघडण्याऐवजी तरुणांशी दीर्घकालीन बँकिंग संबंध निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, आरबीआयच्या अहवालानुसार बँकांनी वैयक्तिक कर्जवाढ अधिक मजबूत उत्पन्न आणि चांगली पत गुणवत्ता असलेल्या कर्जदारांकडे वळवली आहे. नवीन एनपीए निर्मिती कमी झाल्याने बँकांच्या मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT