पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दि पूना मर्चंटस् चेंबर, व्यापार भवन सी-५०, मार्केट यार्ड, पुणे-४११ ०३७ येथील सभागृहात सीए जनार्दन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत बँकेच्या विकासाला हातभार लावणारे बँकेचे प्रतिष्ठित ठेवीदार, अहवाल काळात सामाजिक, शैक्षणिक, उद्योग तसेच क्रीडा इ. क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेले सभासद, खातेदार, संचालक- त्यांचे पाल्य, सेवक व त्यांचे पाल्य यांचा शाल, श्रीफळ, शैक्षणिक साहित्य, फुलझाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे पीपल्स को-ऑप. बँक ही महाराष्ट्र राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप बँकांमधील एक अग्रगण्य बँक असून ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा २७०६ कोटींचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु.१६३३ कोटी, कर्जे रु.१०७३ कोटींचा समावेश आहे. बँकेच्या निव्वळ एनपीएची टक्केवारी ०%, सी.डी. रेशो ६५.७०%, सीआरएआर १५.५९%, निव्वळ नफा रु.१७.४६ कोटी असल्याचे त्याचबरोबर प्रती कर्मचारी व्यवसाय रु. १२.०८ कोटी असल्याचे अध्यक्ष श्री. रणदिवे यांनी नमूद केले. आगामी दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात सभासदांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मा. संचालक मंडळाने अहवाल वर्षासाठी १५.००% दराने लाभांश देण्याचा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवला, त्यास सभेने एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.
बँक मार्च २०२६ अखेर निव्वळ नफा २० कोटी रु. साध्य करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास श्री. रणदिवे यांनी व्यक्त केला. व्यवसाय वाढीसाठीची संधी लक्षात घेऊन नजीकच्या काळात सासवड, शिक्रापूर येथे शाखाविस्तार करण्याचे ठरविण्यात आले असून त्याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेस सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
राज्यात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक हातभार म्हणून मा. संचालक मंडळातर्फे एक दिवसाचा सभा भत्ता व सेवकांकडून १ दिवसाचा पगार तसेच बँकेतर्फे भरीव मदत देण्याचे प्रस्तावित आहे.
स्पर्धेच्या काळात टिकून राहणे हे बँकांसमोरील मोठे आव्हान असून बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी विविध योजनांद्वारे नियोजनबध्द प्रयत्न करीत आहे. सुरक्षा, पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकहित ही बँकेची त्रिसूत्री असून २३ शाखांसह बँक गेल्या ७४ वर्षांपासून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. आज बँकेकडे UPI, IMPS, Mobile Banking App, Rupay ATM, QR Code, NACH, Contact Less Rpay Card अशा आधुनिक सुविधा कार्यान्वित आहेत. याशिवाय स्वतंत्र आय एफ एस सी कोड व थेट सभासदत्व प्राप्त करणे, इंटरनेट बँकिंग सुरु करणे, शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त करणे आदी उद्दिष्टे असल्याचे जेष्ठ संचालक ॲड. सुभाष मोहिते यांनी नमूद केले. तसेच सण-समारंभाच्या निमित्ताने बँकेने सुरु केलेल्या वाहन कर्ज (७.७५% दराने) योजनेचा लाभ बँकेच्या सभासद, ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
सभेत बँकेचे सभासद व प्रसिध्द उद्योजक मा. श्री. शांतीलाल कटारिया यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "बँकांचे ऑडिट हे केवळ रिझर्व्ह बँक किंवा इतर ऑडिटर करत नसून आमच्यासारखे ग्राहकही बँक भेटीच्यावेळी बँकेची कार्यपध्दती व सेवा याबाबत ऑडिट करीत असतात, यामध्ये आपली बँक चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत आली आहे. मी या ठिकाणी आवर्जून नमुद करु इच्छितो की, मी व माझ्यासारख्या सभासद, खातेदारांना अत्यंत समाधानकारक अनुभव व सेवा मिळत आली आहे."
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय भोंडवे यांनी सभेचे संचालन केले, प्रास्ताविक व सभासदांनी विचारलेल्या शंकाचे निरसन अध्यक्ष श्री. रणदिवे यांनी केले. बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲड. सुभाष मोहिते यांनी सभेस मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले.