पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरटीओ चलनाच्या नावाखाली पाठवलेल्या बनावट ‘एपीके (APK)’ फाईलद्वारे मोबाईल हॅक करून सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी चिंचवडेनगर, चिंचवड परिसरात घडली.
या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर आरटीओ चलनाबाबतचा संदेश पाठवण्यात आला होता. या संदेशामध्ये ‘चलन भरावे’ या नावाखाली एक बनावट एपीके फाईल पाठवण्यात आली होती. ही फाईल डाऊनलोड करताच मोबाईलमधील सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय झाली आणि सायबर चोरट्यांना मोबाईलवरील संपूर्ण नियंत्रण मिळाले.
मोबाईल हॅक झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नीच्या एचडीएफसी बँक खात्यांमधून परस्पर व्यवहार करत एकूण २ लाख ४९ हजार रुपये काढून घेतले. बँक खात्यातून पैसे काढल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने तात्काळ बँकेशी संपर्क साधून खाते गोठवले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन पद्धतीने फसवणूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा अॅप्स डाऊनलोड न करण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे.
चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संबंधित मोबाईल नंबर, बँक खात्यांचे व्यवहार आणि सायबर ट्रेलच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.