ग्राहकांचे पैसे कधी मिळणार? 
Co-op Banks

'पेटीएम पेमेंट्स बँक' बंद ! ग्राहकांचे पैसे कधी मिळणार ?

ठेवी परत मिळणारच, पण वेळ आणि प्रक्रिया अजून अस्पष्ट

Vijay chavan

ठेवी सुरक्षित, परताव्याची प्रक्रिया लवकरच स्पष्ट होणार

भारतीय रिझर्व्ह बँके कडून कठोर कारवाई झाल्यानंतर Paytm Payments Bank Limited (पीपीबीएल) च्या ग्राहकांमध्ये त्यांच्या ठेवींच्या सुरक्षिततेबद्दल आणि परतावा कधी मिळणार याबाबत चिंता वाढली आहे. मात्र, नियामक आणि बँक या दोघांनीही स्पष्ट केले आहे की ग्राहकांचे पैसे सुरक्षित असून ते परत केले जाणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर ही संस्था हळूहळू बंद होण्याच्या प्रक्रियेत आहे. तरीही या संक्रमण काळात ग्राहकांच्या निधीचे संरक्षण हे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पैसे सुरक्षित; बँकेकडून आश्वासन

पेटीएम पेमेंट्स बँकेने ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बचत, चालू खात्यांतील रक्कम, वॉलेट्स, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड्समधील सर्व शिल्लक पूर्णपणे सुरक्षित आहे. बँकेकडे सर्व ठेवी परत करण्याइतकी तरलता उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेनेही याला दुजोरा देत, बँकेकडे सर्व ठेव दायित्वांची परतफेड करण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट केले आहे.

परतावा कधी आणि कसा मिळणार?

सध्या परताव्याची नेमकी पद्धत आणि कालावधी जाहीर करण्यात आलेला नसला, तरी येत्या काही आठवड्यांत याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील उपलब्ध शिल्लक काढण्यास किंवा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

२०२२ पासून सुरू कारवाई; २०२४ मध्ये निर्बंध कडक

पीपीबीएलवर कारवाईची सुरुवात मार्च २०२२ पासून झाली. त्यानंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी आरबीआयने मोठा निर्णय घेत, २९ फेब्रुवारी २०२४ नंतर नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली. यानंतर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यास सुरुवात केली.

मोठा ग्राहक आधार आता घटत

कारवाईपूर्वी बँकेकडे ३० कोटींहून अधिक वॉलेट्स आणि ३ कोटी बँक खाती होती. तसेच १० कोटींहून अधिक केवायसी ग्राहक असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, फास्टॅग वितरणातही बँक आघाडीवर होती.

मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर ग्राहकसंख्या झपाट्याने घटत गेली असून, सध्याच्या ठेवी आणि ग्राहकसंख्येचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.

ग्राहकांसाठी महत्त्वाचे काय?

या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे - ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. बँक बंद होत असली तरी, ठरवलेल्या प्रक्रियेनुसार सर्व शिल्लक रक्कम परत दिली जाणार आहे किंवा ग्राहकांना पैसे काढण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

नियामक हस्तक्षेपामुळे बँकेचे कामकाज संपुष्टात येत असले, तरी ठेवीदारांचे हित अबाधित ठेवण्यावर भर दिला जात आहे.

SCROLL FOR NEXT