मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा आणि धाडसी निर्णय घेत Paytm Payments Bank चा बँकिंग परवाना तात्काळ कृती अंतर्गत रद्द केला आहे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण, नियामक नियमांचे उल्लंघन आणि बँकिंग व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या कामकाजात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामध्ये नियमांचे सातत्याने उल्लंघन, अंतर्गत नियंत्रणातील कमतरता, ग्राहक पडताळणी प्रक्रियेमधील त्रुटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव या बाबींचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांच्या निधीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
रिझर्व्ह बँकेने बँकेविरुद्ध कठोर कारवाई करताना बँकेच्या विसर्जनाची प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ग्राहकांचे हित अबाधित राहावे यासाठी सर्व ठेवी परत करण्यासाठी पुरेशी तरलता उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या ठेवींबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान, पेटीएम पेमेंट्स बँकेवर मागील काही वर्षांपासून नियामक निर्बंध लागू करण्यात आले होते. मार्च २०२२ पासून नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही आवश्यक सुधारणा न झाल्यामुळे अखेर रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे समजते.
या निर्णयामुळे डिजिटल बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, इतर पेमेंट बँका आणि फिनटेक कंपन्यांसाठीही हा इशारा मानला जात आहे. नियमांचे पालन, ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक शिस्त यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आरबीआयने दिला आहे.