डिजिटल पेमेंट स्वीकाराला मोठी चालना 
Co-op Banks

एनपीएसटीला सहकारी बँकेकडून UPI स्विचची मोठी ऑर्डर

‘बँक-इन-अ-बॉक्स’ प्लॅटफॉर्ममुळे मर्चंट ॲक्वायरिंग वाढणार, SaaS महसूलाला चालना - सहकारी बँकेसाठी UPI स्विचिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार

Prachi Tadakhe

मुंबई: डिजिटल पेमेंट आणि बँकिंग तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज (NPST) ला एका मोठ्या सहकारी बँकेकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) स्विचिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा महत्त्वाचा करार मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा करार कंपनीच्या ‘बँक-इन-अ-बॉक्स’ प्लॅटफॉर्म अंतर्गत मिळालेली पहिली ऑर्डर ठरली आहे.

या प्रकल्पामुळे संबंधित सहकारी बँकेला आधुनिक आणि स्केलेबल डिजिटल पेमेंट सुविधा अल्पावधीत सुरू करता येणार असून, प्लग-अँड-प्ले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवहार हाताळण्याची क्षमता विकसित होणार आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, ‘बँक-इन-अ-बॉक्स’ प्लॅटफॉर्मची रचना बँकांच्या प्रारंभिक तांत्रिक गुंतवणुकीचा भार कमी करण्यासाठी करण्यात आली आहे. सबस्क्रिप्शन-आधारित या मॉडेलमुळे बँकांना एंटरप्राइझ-ग्रेड पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर सहज उपलब्ध होते.

या उपक्रमामुळे संबंधित सहकारी बँकेला UPI मर्चंट ॲक्वायरिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे व्यापारी नेटवर्कमध्ये डिजिटल पेमेंटचा स्वीकार वाढेल आणि बँकेची डिजिटल उपस्थिती अधिक मजबूत होईल.

एनपीएसटीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चंद ठाकूर यांनी सांगितले की, भारतातील सहकारी बँका सामुदायिक बँकिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तळागाळात डिजिटल पेमेंटचा प्रसार वाढवण्यासाठी त्यांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. ‘बँक-इन-अ-बॉक्स’ प्लॅटफॉर्म तांत्रिक अडथळे दूर करून अशा बँकांना जलद डिजिटल परिवर्तन साध्य करण्यास मदत करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कंपनीने असेही नमूद केले की, लहान व प्रादेशिक वित्तीय संस्थांमध्ये मॉड्युलर डिजिटल पायाभूत सुविधांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे जलद अंमलबजावणी, कार्यक्षमता वाढ आणि नवीन महसूल स्रोत निर्माण होण्यास मदत होत आहे.

UPI व्यवहारांचा व्यापारी स्तरावर वाढता वापर लक्षात घेता, या निर्णयामुळे सहकारी बँका आणि त्यांच्या ग्राहकांमधील डिजिटल व्यवहार अधिक वेगाने वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT