नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक 
Co-op Banks

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेचा कर्जदारांना दिलासा

ऑगस्ट २०२६ पासून निर्णय लागू; सुमारे ४ हजार कर्जदारांना थेट लाभ

Vijay chavan

सभासदांच्या आर्थिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. बँकेने विविध कर्जांवरील व्याजदरात ०.५० टक्के म्हणजेच अर्धा टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट लाभ बँकेच्या सुमारे ४ हजार नियमित कर्जदारांना मिळणार आहे.

जिल्हाभरातील पाच शाखांमधून कार्यरत असलेली ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम, विश्वासार्ह आणि सभासदाभिमुख संस्था म्हणून ओळखली जाते. कर्जावरील व्याजदरात कपात झाल्याने कर्जदारांच्या मासिक आर्थिक भारात काही प्रमाणात घट होण्यास मदत होणार असून, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत हा निर्णय सभासदांसाठी महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे.

सभासदांचे हित हाच सहकाराचा मूलमंत्र

या निर्णयाबाबत माहिती देताना बँकेचे चेअरमन श्री.निलेश देशमुख म्हणाले, “सहकाराचा मूलमंत्र म्हणजे सभासदांचे हित. बँकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्यामुळे कर्जदारांना व्याजदर कपातीचा लाभ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला आहे. भविष्यातही सभासदांना अधिकाधिक सवलती आणि दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

बँकेचे व्हाईस चेअरमन श्री.विनोद जवागे यांनी सांगितले की, कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे हजारो सभासदांच्या आर्थिक भारात घट होण्यास मदत होईल. “सभासदांचा विश्वास हेच बँकेचे सर्वात मोठे बळ आहे. त्यांच्या हितासाठी अशा लोकाभिमुख योजना सातत्याने राबविण्यात येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातही सभासदाभिमुख निर्णय

बँकेच्या प्रगतीसोबतच सभासदांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी भविष्यातही सकारात्मक आणि ग्राहकाभिमुख निर्णय घेतले जातील,असा विश्वास चेअरमन श्री.निलेश देशमुख,व्हाईस चेअरमन श्री.विनोद जवागे, संचालक मंडळ तसेच बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात करण्याच्या या निर्णयाचे सभासदांकडून स्वागत करण्यात येत असून, बँकेच्या सभासदहिताच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

SCROLL FOR NEXT