मुंबई बँक ऑफ इंडिया (टर्नर रोड शाखा) येथील अधिकारी हितेशकुमार सिंगला यांनी वरिष्ठ नागरिक,अल्पवयीन, दिवंगत ग्राहक यांची खाती तसेच निष्क्रिय (डॉर्मंट) खाती लक्ष्य करून तब्बल १६.१० कोटींच्या निधी व सोन्याचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीत या गैरव्यवहाराचे धक्कादायक तपशील समोर आले असून,सिंगलाला अटक करून २३ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्यात आले आहे.
१ ऑगस्ट रोजी दिवंगत वरिष्ठ नागरिक ग्राहक मॉर्गन मिरांडा यांचे वारसदार आपल्या वडिलांच्या वरिष्ठ नागरिक बचत योजना आणि मुदतठेवींची चौकशी करण्यासाठी शाखेत गेले होते. यावेळी बँकेला तपासात दिसून आले की, मिरांडा यांच्या ३६ लाख रुपयांच्या ठेवी बिनाअनुमती अकाली बंद केल्या होत्या. याच चौकशीदरम्यान हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.
फसवणुकीची पद्धत:
सिंगला बँकेच्या नोंदी तपासत असे आणि ज्या खात्यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे, अशी खाती निवडत असे. त्यानंतर ती खाती – मुदतठेवी, वरिष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाती, बचत व चालू खाती बेकायदेशीररीत्या बंद केली जात असत.
बंद केलेला निधी थेट वैयक्तिक खात्यात न टाकता, प्रथम शाखेच्या अंतर्गत ऑफिस अकाउंट मध्ये वर्ग करण्यात येई. हे खाते नियमित समायोजन, उलट व्यवहार आणि रीकॉन्सिलिएशन (बँक खात्यांचा ताळमेळ) साठी असते. त्यामुळे साहजिकच संशय निर्माण होत नसे.
त्यानंतर हे पैसे सिंगलाच्या पंजाबमधील होशियारपूर येथील एसबीआयमधील वैयक्तिक खात्यात वळवले जात.
डिजिटल पुरावे विस्कळीत करण्यासाठी त्याने सहकाऱ्यांच्या लॉगिन आयडींचा गैरवापर केला. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी व्यवहार मंजूर केले असा भास निर्माण होत असे.
स्वयंचलित अलर्ट टाळण्यासाठी निधी मोठ्या रकमेऐवजी छोट्या-छोट्या हप्त्यांत वळवला जात असे.
चौकशीत धक्कादायक माहिती उघड:
बँकेच्या केलेल्या चौकशीत चार शाखांमधील एकूण १२७ खाती अशाच प्रकारे प्रभावित झाल्याचे निदर्शनास आले. या ठेवी विअनुमती बंद करून निधी सिंगलाच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आला होता. ईडीच्या तपासानुसार, शाखेच्या ऑफिस खात्यांचा दीर्घकाळ ट्रान्झिट लेजर (तात्पुरत्या नोंदीचे खाते ) म्हणून वापर करण्यात आला, प्रत्यक्ष देखरेख कमकुवत, कर्मचारी आयडींचा गैरवापर, तसेच टप्प्याटप्प्याने-छोट्या हप्त्यांत पैसे वळवणे – या सगळ्यामुळे हा घोटाळा दोन वर्षांहून अधिक काळ कोणाच्याही लक्षात आला नाही.
धक्कादायक निष्कर्ष:
या अपहारातील मोठा भाग शेअर बाजारात गुंतवला गेला होता.
सिंगलाच्या झेरोधा, अपस्टॉक्स आणि ग्रो या डिमॅट (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेल्या ) खात्यांच्या तपासणीत किमान २८.२७ कोटींची गुंतवणूक झाल्याचे आढळले.
सध्या कोणतेही होल्डिंग शिल्लक नाही, मात्र अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की याद्वारे मिळालेला नफा सिंगलाकडून अन्यत्र वळवण्यात आला आहे.
याशिवाय, त्याच्याकडून २१.४२ कोटी रुपये दुसऱ्या एका बँक कर्मचाऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
सुमारे ५ लाख रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले आहेत.
अनेक व्यवहार सहकाऱ्यांच्या खात्यांतून लेयर (टप्प्याटप्प्याने वळवणे) करण्यात आले आहेत.
बँको टिपणी : ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेऊन बँकेप्रती त्यांची विश्वसनीयता वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणून विविध तंत्रज्ञानाचा अवलंब केला तरीही सायबर गुन्हेगार विविध क्लुप्त्या योजून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारत असतात. मात्र, एका बँकरकडूनच ग्राहकांच्या पैशांवर हात साफ करणे म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे असे गुन्हे गांभीर्याने हाताळून त्यावर त्वरित अधिक कठोर उपाय योजने अत्यावश्यक आहे.