इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्ण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशन, मुंबई यांचेकडून 'सर्वोत्कृष्ट बँक' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार, राष्ट्रीय नागरी सह. वित्त विकास महामंडळ (NUCFDC) मुंबईचे अध्यक्ष श्री.ज्योतिंद्रभाई मेहता यांच्या शुभहस्ते व आमदार प्रवीण दरेकर, महाराष्ट्र राज्य बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री. अजय ब्रम्हेचा, उपाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
समाजाच्या सर्वच स्तरातील घटकांना आर्थिक मदतीचा हात देवून, त्यांचा उद्योग व्यवसाय विकसित करणे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी तात्काळ दूर करण्याच्या उदात्त हेतूने १९६३ साली स्थापन झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने, संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ५४ शाखांच्या माध्यमातून शाखा विस्तार करून, जनसामान्यांच्या आर्थिक हितास कटिबध्द राहिल्यामुळे ही बँक जनमानसात लोकाभिमुख झाली व सहकारी बँकिंग क्षेत्रात एक आदर्श बँक म्हणून नावारूपास आलेली आहे. याचेच प्रतीक म्हणून आज बँकेस सहकारी बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन श्री.स्वप्निल आवाडे यांनी या प्रसंगी केले.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना ज्या आर्थिक सुविधा देत आहेत, त्या सर्व सुविधा कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना देण्यासाठी बँक नेहमी अग्रभागी राहिली आहे व अत्याधुनिक सर्व सुविधा बँक ग्राहकांना देत आहे.
बँकेचा ग्राहक हा केंद्रबिंदू मानून, त्यांच्या आर्थिक अडचणींचे निराकरण करणे, उद्योगधंद्यांना चालना देणे, व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार करणेस सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करणे, सौहार्दपूर्ण सेवा देणे, अद्ययावत तांत्रिक सुविधा देणे या व यासारख्या अनेक सुविधांच्या माध्यमातून बँकेने सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून, ग्राहक व बँक यांच्यातील नाते अतूट धाग्याने गुंफल्यामुळे, ही बँक सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावारूपास आलेली आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन श्री.स्वप्निल आवाडे यांनी केले व येथून पुढील काळातही बँक सर्वसामान्यांच्या आर्थिक हितास कटिबध्द राहून, त्यांच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य बँक्स फेडरेशनचे सर्व संचालक, बँकेचे व्हा. चेअरमन सीए श्री. संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे चेअरमन सीए श्री. चंद्रकांत चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय शिरगावे, काळबादेवी मुंबई क्लस्टर हेड श्री. संतोष सावंत तसेच विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.