
इचलकरंजी: येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इचलकरंजीच्या ८ व्या, कुरुंदवाड शाखेचा शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या वेळी श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेने समाजामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे, याच विश्वासाला बळ देत कुरुंदवाड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाला झळाळी देण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावा, त्याचबरोबर आर्यचाणक्य पतसंस्थेस या परिसरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र राशिनकर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र डांगे, शरदचंद्र पराडकर, भालचंद्र पुजारी, सागर चौगुले, अरविंद मजलेकर, धनपाल आलासे आदी मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्ष पंकज मेहता तसेच संस्थापक अध्यक्ष जवाहरजी छाबडा व्यासपीठावर उपस्थित होते. सध्या संस्थेकडे २३५ कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने एकूण १४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक १२५ कोटी असून निव्वळ एनपीए ०% आहे. पतसंस्थेमध्ये घरकुल कर्ज, सोलर कर्ज, तसेच रुपये ८० हजारापर्यंत कमीतकमी व्याजदरात सोने तारण कर्ज ही योजना सुरूआहे, असे अध्यक्ष राशिनकर यांनी बोलताना सांगितले. संचालक रामकिशोर भुतडा यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.
नामदेव मंडप, बाजारपेठ, बहिरेवाडी रोड, कुरुंदवाड येथे झालेल्या या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी, अधिकारी, सेवक वर्ग,सभासद, हितचिंतक, तसेच कुरुंदवाड पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.