क्रेडिट स्कोअर 
Co-op Banks

क्रेडिट स्कोअर वाढवण्याचे सोपे उपाय!

एका वर्षात ५५० वरून ७५० पर्यंत नेणे शक्य

Pratap Patil

येथे प्रथम क्रेडिट स्कोअर म्हणजे काय हे जाणून घेऊया. एखाद्या व्यक्तीने घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्डवरील व्यवहारांची केलेली परतफेड, बँक व्यवहार इत्यादींच्या आधारे त्या व्यक्तीवर बँक किंवा वित्तीय संस्था किती विश्वास ठेवू शकते हे दाखवणारा संख्या आधारित अहवाल म्हणजे क्रेडिट स्कोअर.थोडक्यात, क्रेडिट स्कोअर (Credit Score) म्हणजे एखाद्या व्यक्तीची कर्ज परतफेड करण्याची क्षमता दाखवणारा गुणांक होय.

काही जणांना त्यांचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यामुळे कर्ज घेण्यात किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येतात. परंतु,अशा व्यक्तींनी योग्य आर्थिक नियोजन करून शिस्त पाळल्यास केवळ एका वर्षाच्या कालावधीत ते आपला क्रेडिट स्कोअर ५५० वरून ७५० पर्यंत नेऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

यासाठी लक्षात घ्यावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी:

  • १.क्रेडिट रिपोर्ट (पत अहवाल) तपासा:

सुरुवातीला स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट तपासा आणि त्यामध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्तीसाठी क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीकडे तक्रार नोंदवा.

  • २.थकीत देयके भरा:

क्रेडिट स्कोअर कमी होण्याचे प्रमुख कारण थकबाकी असते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर सर्व थकीत देणी फेडणे आवश्यक आहे.

  • ३.क्रेडिट कार्डचा जबाबदारीने वापर करा:

क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण एकूण मर्यादेच्या ३० टक्क्यांपेक्षा कमी ठेवणे फायदेशीर ठरते. वेळेवर परतफेड करून या सुविधेचा जबाबदारीने वापर करणे महत्त्वाचे आहे.

  • ४.कर्जाचे निरोगी मिश्रण ठेवा (अर्थात सुरक्षित,असुरक्षित कर्जाचे योग्य नियोजन करणे):

फक्त क्रेडिट कार्डवर अवलंबून न राहता सुरक्षित व असुरक्षित अशा विविध प्रकारच्या कर्जांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एफडीवर कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय आहे.

  • ५.नवीन कर्ज अर्जांची संख्या कमी ठेवा:

वारंवार क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज केल्यास ‘हार्ड इन्क्वायरी’ होते व स्कोअर कमी होतो. त्यामुळे अनावश्यक कर्जासाठी अर्ज करणे टाळावे.

  • ६.जुनी बँक खाती सक्रिय ठेवा:

जुनी क्रेडिट कार्ड खाती बंद न करता सक्रिय ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते, कारण दीर्घकालीन क्रेडिट इतिहासामुळे स्कोअर वाढतो. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यास ५५० चा स्कोअर एका वर्षात ७५० पर्यंत वाढवणे अशक्य नाही.

SCROLL FOR NEXT