५६ व्या वर्धापनदिनानिमित्त DNS Bank चा मोठा गौरव; मिळाले 'Great Place to Work®' प्रमाणपत्र. 
Co-op Banks

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला प्रतिष्ठित ‘Great Place to Work®’ प्रमाणपत्र प्राप्त

५६ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत नवा मैलाचा दगड; नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या कार्यकाळातील पहिली सकारात्मक सुरुवात.

Prachi Tadakhe

डोंबिवली: भारतातील अग्रणी आणि प्रगतशील बहुराज्यीय शेड्युल्ड सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड (DNS Bank) च्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 'Great Place to Work® Institute, India' कडून बँकेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानले जाणारे ‘Great Place to Work®’ हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बँकेच्या ५६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अध्यक्ष ॲड. गणेश वसंत धारगळकर यांनी या ऐतिहासिक यशाची अधिकृत घोषणा केली.

नुकत्याच गठित झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या कार्यकाळातील हा पहिलाच महत्त्वपूर्ण सन्मान असून, बँकेच्या ५६ वर्षांच्या प्रवासातील एक मोठा मैलाचा दगड ठरला आहे.

'Great Place to Work®' हे प्रमाणपत्र पूर्णपणे बँकेतील कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अभिप्राय (Survey) आणि प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित आहे. बँकेतील परस्पर विश्वास, सकारात्मक कार्यसंस्कृती, पारदर्शकता आणि कर्मचारीकेंद्री नेतृत्व या मूल्यांवर कर्मचाऱ्यांनी दिलेली ही पावती आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत आपल्या शाखांचे जाळे विस्तारताना DNS Bank ने नेहमीच विश्वास, सहकार, सामूहिक प्रगती आणि सेवाभाव ही मूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत.

या प्रसंगी अध्यक्ष ॲड. गणेश वसंत धारगळकर म्हणाले, “हा सन्मान DNS Bank परिवारातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अथक परिश्रम, समर्पण आणि योगदानाला समर्पित आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा गौरव बँकेसाठी अत्यंत आनंदाचा आणि आगामी वाटचालीस नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.”

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विश्राम दीक्षित यांनी सांगितले की, “हे प्रमाणपत्र आमच्या कर्मचाऱ्यांचा संस्थेवरील आणि व्यवस्थापनावरील दृढ विश्वास अधोरेखित करते. आगामी काळात अधिक नावीन्यपूर्ण, उत्तरदायी आणि ग्राहककेंद्री कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी ही ओळख आम्हास निश्चितच प्रेरणा देईल.”

DNS Bank सध्या आपल्या मनुष्यबळ धोरणांमध्ये (HR Policies) आधुनिक आणि भविष्यवेधी बदल घडवून आणत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील घटकांना प्राधान्य दिले जात आहे:

  • कर्मचारी विकास व कौशल्यवृद्धी: नव्या तंत्रज्ञानानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे.

  • पारदर्शक संवाद व नेतृत्वविकास: व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील सुसंवाद अधिक दृढ करणे.

  • सर्वसमावेशकता व कल्याण: कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपणाऱ्या योजना राबवणे.

बँकेच्या धोरणानुसार, उत्कृष्ट ग्राहकसेवा ही केवळ आनंदी आणि सक्षम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच शक्य होते. त्यामुळे कर्मचारी अनुभव (Employee Experience) समृद्ध करून ग्राहक अनुभव (Customer Experience) अधिक दर्जेदार बनवण्यावर बँकेचा भर आहे.

सहकार क्षेत्रातील डिजिटल आणि आधुनिक क्रांती

या आंतरराष्ट्रीय मानकामुळे जागतिक स्तरावर असा बहुमान मिळवणाऱ्या भारतातील मोजक्या आणि अग्रणी बहुराज्यीय शेड्युल्ड सहकारी बँकांच्या यादीत आता DNS Bank चा समावेश झाला आहे.

सहकाराच्या पारंपारिक मूल्यांची जपणूक करत आधुनिक, तंत्रज्ञान-सक्षम आणि कर्मचारीकेंद्री बँक घडविण्याच्या बँकेच्या संकल्पाला या 'Great Place to Work®' प्रमाणपत्राने अधिक बळ दिले आहे.

SCROLL FOR NEXT