मिरज : डिजिटल अरेस्टची भीती घालून सायबर भामट्यांनी मिरजेतील निवृत्त एसटी अधिकाऱ्याला तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पोलिस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवत आरोपींनी ही फसवणूक केली असून, याप्रकरणी रवींद्र कुलकर्णी (निवृत्त एसटी अधिकारी) यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक ३ ते १२ सप्टेंबर या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी रवींद्र कुलकर्णी यांच्याशी व्हॉट्सॲप कॉल व मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला पोलिस व सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत, कुलकर्णी यांच्यावर गंभीर आर्थिक गुन्ह्याचा आरोप केला.
भामट्यांनी सांगितले की, विजय मल्ल्या टोळीतील नरेश गोयल याच्या घरातून अडीचशे बनावट बँक पासबुक सापडली असून, त्यामध्ये कुलकर्णी यांच्या नावाचेही पासबुक आहे. संबंधित खात्यातून हवाला व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा बनाव करण्यात आला.
फसवणूक करणाऱ्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत असून, तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडूनही कुलकर्णी यांच्या खात्यांची तपासणी सुरू आहे. खात्यातील रक्कम वैध आहे की हवाला व्यवहारातून आलेली आहे, याची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण केले.
खाते गोठवण्याची व सीबीआयमार्फत अटक करण्याची धमकी देत, कुलकर्णी यांना त्यांच्या बँक खात्यातील ९५ टक्के रक्कम पडताळणीसाठी दिलेल्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडण्यात आले.
या भीतीमुळे कुलकर्णी यांनी त्यांच्या
स्टेट बँक ऑफ इंडिया,
एचडीएफसी बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
या खात्यांमधील रक्कम पुढील खात्यांमध्ये वर्ग केली :
आरोमानी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
वर्ल्ड टच हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस
एमएमएस सोशल वेल्फेअर ट्रस्ट
दिल्लीतील करण धवन याचे खाते
गुडगाव येथील पंजार इंटरप्रायझेस
नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी सायबर फसवणूक म्हणून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिस, सीबीआय किंवा आरबीआय कधीही फोनवरून पैसे मागत नाहीत. अशा प्रकारच्या कॉल्स आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधावा.