पुढील ३ दिवस राज्यातील 'या' बँकांमध्ये व्यवहार राहणार चालू 
Co-op Banks

२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान सहकारी बँकिंग सेवा सुरूच राहणार

UCBs आणि DCCBs चा संपाला पाठिंबा नाही; जवळपास १८०० हून अधिक सहकारी बँकांचा संपात सहभागी न होण्याचा कौल.

Prachi Tadakhe

मुंबई: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशभरात तीन दिवसीय बँक संपाची हाक दिली आहे. मात्र, या संपाचा सहकारी बँकिंग क्षेत्रावर कोणताही परिणाम होणार नसून, सर्व सहकारी बँका या काळात पूर्ण क्षमतेने आणि नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन प्रमुख संघटनांनी आज ही महत्त्वपूर्ण माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज (NAFCUB), नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स (NAFSCOB) या तिन्ही प्रमुख संघटनांनी स्पष्ट केले आहे की, सहकारी बँका या संपात सहभागी होणार नाहीत. ग्राहक, शेतकरी, व्यापारी आणि सदस्यांना अखंडित बँकिंग सेवा पुरवण्यासाठी सर्व संस्था कटिबद्ध आहेत.

भारतातील ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात सहकारी बँकिंगचे प्रचंड जाळे पसरलेले आहे. यामध्ये:

  • १,४५० नागरी सहकारी बँका (UCBs)

  • ३४ राज्य सहकारी बँका (StCBs)

  • ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs)

या सर्व बँका २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान नियमित वेळेत उघड्या राहतील, ज्यामुळे शेतकरी, छोटे उद्योजक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबणार नाहीत.

ग्राहकांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?

संपाच्या काळात ग्राहक आणि सभासद आपल्या जवळच्या सहकारी बँकेच्या शाखेत किंवा डिजिटल माध्यमांद्वारे खालील सेवांचा लाभ घेऊ शकतात:

  1. शाखा बँकिंग: रोख ठेवी स्वीकारणे, पैसे काढणे, ड्राफ्ट आणि इतर दैनंदिन व्यवहार.

  2. कृषी व ग्रामीण पतपुरवठा: शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांसाठी कर्जाशी संबंधित व पतपुरवठ्याचे व्यवहार पूर्ववत सुरू राहतील.

  3. व्यावसायिक सेवा: व्यापारी आणि सूक्ष्म-लघु उद्योजकांसाठीच्या बँकिंग सुविधा उपलब्ध असतील.

  4. डिजिटल बँकिंग: संबंधित बँकांचे एटीएम (ATM), मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि यूपीआय (UPI) सेवा सुरळीत सुरू राहतील.

संघटनांचे नागरिकांना आवाहन

"तळागाळातील सामान्य जनता, शेतकरी आणि स्थानिक व्यवसायांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सहकारी बँकिंग क्षेत्र आपली सेवा अखंडित चालू ठेवणार आहे," असे आश्वासन NAFCUB, NUCFDC आणि NAFSCOB ने दिले आहे.

विशिष्ट सेवा किंवा व्यवहारांच्या वेळेबाबत अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपापल्या स्थानिक सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही या संघटनांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT