Arth Warta

CIBIL मध्ये 'Settled' ऐवजी 'Closed' स्टेटस का महत्त्वाचे? बँक ग्राहकांसाठी मोलाचा सल्ला

एनओसी मिळवण्यापासून ते सिबिल अपडेट करेपर्यंतची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Prachi Tadakhe

नवी दिल्ली: आर्थिक अडचणींमुळे अनेकदा कर्जदारांना बँकेचे संपूर्ण कर्ज फेडणे शक्य होत नाही. अशा वेळी काहीजण बँकेशी चर्चा करून कमी रक्कम भरून कर्जाचा निपटारा करतात. या प्रक्रियेला 'लोन सेटलमेंट' (Loan Settlement) असे म्हणतात. यामुळे तात्पुरता आर्थिक भार कमी होत असला, तरी भविष्यात नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. कर्जाची संपूर्ण परतफेड न करता तडजोडीतून खाते बंद केल्यास क्रेडिट रिपोर्टमध्ये 'सेटल्ड' (Settled) असा शेरा नोंदवला जातो, ज्याचा थेट परिणाम कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर आणि भविष्यातील कर्ज मंजुरीवर होतो.

'सेटल्ड' आणि 'क्लोज्ड' स्टेटसमध्ये नेमका फरक काय?

  • क्लोज्ड (Closed): कर्जदाराने कर्जाची संपूर्ण मूळ रक्कम आणि लागू व्याजाची परतफेड केल्यास बँक संबंधित कर्ज खाते 'क्लोज्ड' म्हणून नोंदवते. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, कर्जदाराने आपली सर्व आर्थिक जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे.

  • सेटल्ड (Settled): दुसरीकडे, कर्जदाराला संपूर्ण कर्ज फेडणे शक्य नसलेस बँक काही कमी रक्कम स्वीकारून कर्जाचा निपटारा करण्यास सहमती दर्शवते. अशा वेळी संबंधित खाते 'सेटल्ड' म्हणून नोंदवले जाते.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, 'क्लोज्ड' म्हणजे कर्जाची पूर्ण परतफेड, तर 'सेटल्ड' म्हणजे बँकेच्या संमतीने कमी रक्कम भरून केलेले तडजोडीचे खाते बंद.

नवीन कर्जाच्या अर्जावर होतो गंभीर परिणाम

नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यानंतर बँका सर्वप्रथम अर्जदाराच्या क्रेडिट रिपोर्टची सखोल तपासणी करतात. त्यातील 'अकाउंट इन्फॉर्मेशन' विभागात जुन्या कर्जाची परतफेड आणि खाते स्थितीची माहिती असते.

एखाद्या जुन्या कर्जासमोर 'सेटल्ड' असा शेरा असल्यासबैंक अर्जदाराच्या भूतकालीन कर्जफेडीच्या इतिहासाबाबत साशंक होते. यामुळे कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत कायदेशीर व तांत्रिक अडचणी येऊ शकतात. सेटलमेंटचा उल्लेख क्रेडिट स्कोअरवर प्रतिकूल परिणाम करतो; परिणामी, गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज अर्ज करताना बँक अतिरिक्त कागदपत्रे मागू शकते किंवा थेट अर्ज नाकारू शकते.

(टीप: कर्ज मंजुरीचा अंतिम निर्णय संबंधित बँकेच्या अंतर्गत धोरणांवर आणि अर्जदाराच्या एकूण क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून असतो.)

एका उदाहरणातून समजून घ्या...

समजा, एका व्यक्तीने युरोप दौऱ्यासाठी ५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले. सुरुवातीला त्याने नियमित हप्ते भरले, मात्र काही कारणामुळे उर्वरित ३ लाख रुपयांची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत बँकेशी चर्चा केल्यानंतर दीड लाख रुपये भरून कर्जाचा निपटारा करण्यावर सहमती झाली. संबंधित व्यक्तीने ही रक्कम भरली आणि त्याला आपली कर्जाची जबाबदारी संपल्याचे वाटले.

मात्र, काही वर्षांनंतर जेव्हा त्याने गृहकर्जासाठी अर्ज केला, तेव्हा त्याला नाहक अडचणींचा सामना करावा लागला. कारण त्याच्या सिबिल अहवालात जुन्या कर्जासमोर 'सेटल्ड' असा शेरा कायम होता.

केवळ एनओसी (NOC) मिळाल्याने किंवा सिबिलकडे तक्रार दाखल केल्याने खाते आपोआप 'क्लोज्ड' होईलच असे नाही. बँकेच्या नोंदीमध्ये संपूर्ण परतफेड झाल्याची पुष्टी आणि क्रेडिट ब्युरोकडे अद्ययावत माहिती पाठवणे आवश्यक असते. तसेच, खाते स्थिती बदलली तरी पूर्वीच्या परतफेडीच्या इतिहासाचा क्रेडिट स्कोअरवर काही काळ परिणाम राहू शकतो.

'सेटल्ड' स्टेटसचे 'क्लोज्ड'मध्ये रूपांतर कसे करावे?

आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर जुन्या कर्जाची उर्वरित रक्कम भरून आपले क्रेडिट प्रोफाइल सुधारणे शक्य आहे. त्यासाठी पुढील टप्प्यांचा अवलंब करता येऊ शकतो:

१. उर्वरित रक्कम भरा: ज्या बँकेकडून कर्ज घेतले होते, त्या बँकेशी संपर्क साधा. सेटलमेंटच्या वेळी माफ करण्यात आलेली उर्वरित रक्कम भरून कर्जाची संपूर्ण परतफेड करण्याची इच्छा व्यक्त करा आणि बँकेकडून त्या रकमेची लेखी माहिती घ्या.

२. नो ड्यूज सर्टिफिकेट (NOC) मिळवा: संपूर्ण देय रक्कम भरल्यानंतर बँकेकडून 'नो ड्यूज सर्टिफिकेट' किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवर्जून मिळवा. कर्जाची कोणतीही थकबाकी शिल्लक नसल्याचा हा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर पुरावा असतो.

३. सिबिलकडे तक्रार नोंदवा: ट्रान्सयुनियन सिबिलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन क्रेडिट रिपोर्टमधील चुकीची किंवा अद्ययावत करावयाची माहिती याबाबत तक्रार नोंदवा. बँकेकडून मिळालेला एनओसीचा तपशील आणि आवश्यक कागदपत्रे यात सादर करा.

४. बँकेकडून माहिती अद्ययावत करून घ्या: सिबिल संबंधित बँकेकडे माहितीची पडताळणी करण्यासाठी पाठपुरावा करू शकते. बँकेने संपूर्ण परतफेडीची पुष्टी केल्यानंतर क्रेडिट रिपोर्टमधील खाते स्थिती बदलू शकते.

५. अद्ययावत क्रेडिट रिपोर्ट तपासा: वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करून खाते स्थिती पुन्हा तपासा. अहवालात 'सेटल्ड' ऐवजी योग्य 'क्लोज्ड' स्टेटस नोंदवले गेले आहे का, याची खात्री करा.

कर्ज सेटलमेंटचा मार्ग तात्पुरता दिलासा देत असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी शक्यतो कर्जाची संपूर्ण परतफेड करणेच केव्हाही फायदेशीर ठ ठरते.

SCROLL FOR NEXT