कोल्हापूर: सध्या संपूर्ण देशामध्ये 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढले आहे. सायबर भामट्यांकडून दररोज हजारो कोटी रुपयांचा गंडा नागरिकांना घातला जात आहे. या गंभीर गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी आणि डिजिटल अरेस्टचा बनाव वेळीच ओळखून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सीबीआयने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित 'अभय' (Abhay) नावाचे नवीन अॅप्लिकेशन विकसित केले असून या माध्यमातून संशयास्पद 'अरेस्ट नोटीस'ची तत्काळ सत्यता पडताळणी करणे शक्य होणार आहे.
सायबर गुन्हेगार प्रामुख्याने सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सअॅप (WhatsApp) किंवा ई-मेलवर बनावट समन्स अथवा अरेस्ट नोटीस पाठवतात. नागरिकांची हीच भीती ओळखून सीबीआयने 'अभय' अॅपमध्ये अत्याधुनिक एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे अॅप तुम्हाला आलेली नोटीस खरी आहे की बनावट, हे अवघ्या एका क्लिकमध्ये ओळखण्यास मदत करते.
एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आणि आर्थिक नुकसानीत लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या ४,१०३ तक्रारी दाखल झाल्या होत्या, ज्यामध्ये नागरिकांची तब्बल ५५ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक झाली. यापैकी ५ कोटी ९२ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात (Recover) पोलिसांना यश आले.
त्यानंतर २०२५ मध्ये हा आकडा आणखी वाढला आणि तक्रारींची संख्या ४,४६५ वर पोहोचली. या वर्षात ४४ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक झाली असून ६ कोटी ५३ लाख रुपये गोठवण्यात आले. तर चालू वर्ष म्हणजेच २०२६ मध्ये आतापर्यंत १,७७३ तक्रारींची नोंद झाली असून नागरिकांना १९ कोटी ९८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे, ज्यातील कोटी १५ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता सायबर गुन्हेगार किती सक्रिय आहेत, हे स्पष्ट होते.
भामट्यांकडून आलेली नोटीस खरी आहे की खोटी, हे तपासण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटला (cbi.gov.in) भेट देणे आवश्यक आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या 'अभय' लोगोवर क्लिक करून मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) व्हेरीफाय करावा. त्यानंतर ठगसेनांनी पाठवलेली नोटीस स्कॅन करून अपलोड करताच, अवघ्या काही सेकंदांतच ही नोटीस अधिकृत आहे की बनावट, याची पडताळणी होऊन निकाल समोर येतो.
जर दुर्दैवाने तुमची सायबर फसवणूक झाली असेल, तर वेळ न घालवता खालील माध्यमांद्वारे त्वरित संपर्क साधावा:
नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर: १९३० (सेंट्रल)
एनसीआरपी पोर्टल (NCRP Portal): अधिकृत सायबर पोर्टल (सेंट्रल)
अभय अॅप्लिकेशन हेल्पलाइन / कोल्हापूर पोलीस संपर्क: 8412841100
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा हा वापर सुरू केला आहे. मात्र, या तंत्रज्ञानासोबतच नागरिकांची सतर्कता आणि 'घाबरून न जाण्याची' वृत्तीच सायबर गुन्हेगारांचे मनसुबे पूर्णपणे उधळवून लावू शकते. तुम्हालाही असा कोणताही संशयास्पद कॉल किंवा समन्स आल्यास त्वरित 'अभय' अॅपद्वारे त्याची खातरजमा करा आणि सुरक्षित राहा.