मालकाचा फोटो लावून कर्मचाऱ्यांची दिशाभूल; 'कार्गो मुव्हर्स' कंपनीचे ६२ लाख गायब 
Arth Warta

बनावट व्हॉट्सॲप मेसेज अन् ६२ लाखांचा सायबर दरोडा!

मालकाच्या DP चा वापर करून सायबर भामट्यांनी मारला डल्ला; पगार अडवून बँक खात्यातून पैसे उकळले.

Prachi Tadakhe

सायबर भामट्यांच्या नवनवीन युक्त्यांचा फटका आता कार्पोरेट क्षेत्रालाही बसू लागला आहे. कंपनीच्या मालकाचे नाव आणि फोटोचा गैरवापर करून बेलापूर येथील एका नामांकित लॉजिस्टिक कंपनीतील कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट व्हॉट्सॲप संदेशांच्या माध्यमातून कंपनी कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढून तब्बल ६२ लाख रुपये भामट्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळवून घेतले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

बेलापूर येथील ‘कार्गो मुव्हर्स अँड लॉजिस्टिक प्रा. लि.’ या कंपनीत हा ६२ लाखांचा आर्थिक घोटाळा घडला आहे. कंपनीचे मूळ मालक ए. जी. जॉर्ज हे परदेशात वास्तव्यास असून ते अधूनमधून कंपनीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी भारतात येतात. १९ ऑगस्ट रोजी कंपनीच्या अकाउंट विभागात काम करणाऱ्या शितल पवार यांना मालक जॉर्ज यांच्या नावाने आणि त्यांच्याच फोटोचा प्रोफाईल पिक्चर (DP) असलेल्या एका व्हॉट्सॲप नंबरवरून संदेश आला.

संदेशात कंपनीच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर इंडसइंड बँकेच्या एका खात्यावर तातडीने ९५ लाख रुपये पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या दैनंदिन व्यवहाराची मर्यादा ५० लाख रुपये असल्याचे सांगितल्यानंतर, भामट्याने टप्प्याटप्प्याने पैसे पाठवण्यास सांगितले. मालकाचाच मेसेज आहे या विश्वासाने कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात ३० लाख रुपये दिलेल्या खात्यावर वर्ग केले.

पहिल्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा त्याच व्हॉट्सॲप खात्यावरून ३२ लाख रुपये वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले. कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, "पगार दुसऱ्या दिवशी करा, सध्या हे पैसे पाठवून द्या" असे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी ३२ लाख रुपये पुन्हा संबंधित खात्यात जमा केले. अशा प्रकारे एकूण ६२ लाख रुपये कंपनीच्या खात्यातून भामट्यांच्या खात्यात गेले.

अशी उघडकीस आली फसवणूक

३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी या मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत मूळ मालक ए. जी. जॉर्ज यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी जॉर्ज यांनी असा कोणताही व्हॉट्सॲप मेसेज पाठवला नसल्याचे आणि पैशांची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे कर्मचाऱ्यांचे पाय जमिनीवरच खिळले.

कंपनीचे बँक स्टेटमेंट तपासले असता ज्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले होते, ती खाती कंपनीच्या कोणत्याही अधिकृत विक्रेत्याची (Vendors) नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीने तत्काळ बँकेशी संपर्क साधून व्यवहार थांबवण्याची विनंती केली. तसेच सायबर क्राईम हेल्पलाइन ‘१९३०’ आणि राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (NCRP) अधिकृत तक्रार नोंदवली.

याप्रकरणी कंपनीतील अकाउंटंट अमोल पाटील यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मालकाचा फोटो आणि नाव वापरून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून हा सायबर दरोडा टाकण्यात आला आहे. ज्या व्हॉट्सॲप नंबरवरून मेसेज आले आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग झाले, त्यांच्या तांत्रिक माहितीच्या (IP Address & Bank Details) आधारे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता सायबर पोलिसांसमोर आहे.

SCROLL FOR NEXT