सावतामाळी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. सभेला संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सभासदांची मोठी उपस्थिती होती.
मुख्य उपस्थिती आणि मार्गदर्शन
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश भास्कर नाईक होते. यावेळी उपाध्यक्ष जगदीश कवळे, संचालक प्रकाश पाटील, श्रीकांत नाईक, पुष्पा पडते, दयाराम अलिबागकर, हर्षल नाईक, अजय राऊळ, नाना भगत, दिलीप बना, आशा घरत आणि तज्ज्ञ संचालक श्री. परशुराम म्हात्रे,सल्लागार शहाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.राज्य सहकारी संघाचे अधिकारी प्रा. एस.बी. वटाणे यांनी सभासदांना सहकार क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि संस्था सशक्त कशी राहील याबाबत मार्गदर्शन केले. सावतामाळी पतसंस्थेच्या या सभेने ना केवळ आर्थिक पारदर्शकतेचा आदर्श ठेवलाय, तर सामाजिक भान जपत उभ्या ठाकलेल्या संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. अशा संस्थांनी इतर पतसंस्थांसाठी आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सन्मान आणि गौरव
पतसंस्थेचे कर्मचारी श्री. दिपक राऊळ यांनी पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मास्टर कॅटेगरीत सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने त्यांचं विशेष अभिनंदन करण्यात आलं.
विषय सूचीवर चर्चा व निर्णय
सभेत व्यवस्थापक राकेश म्हात्रे यांनी दिवंगत सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला व सर्व सभासदांनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली. यानंतर अजेंड्यावरील ११ विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली. सर्व विषयांवर व्यवस्थापकांनी सविस्तर माहिती दिली व सर्व मुद्दे एकमताने मंजूर करण्यात आले.
आभार प्रदर्शन
सभेच्या शेवटी उपाध्यक्ष जगदिश कवळे यांनी सर्व मान्यवर, सभासद आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.