
हैदराबादस्थित सिटीझन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने दक्षिण भारतातील आघाडीच्या बहु-राज्यीय पतसंस्था म्हणून आपली पत अधिक भक्कम करत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ८१.९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला असून, संस्थेचा एकूण व्यवसाय ४,३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे या यशाच्या अनुषंगाने सोसायटीने आपले रूपांतर पूर्ण सहकारी बँकेत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बँकांमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या पतसंस्थांसाठी स्थापन करण्यात आलेल्या NAFCUB टास्क फोर्सकडे व्यवस्थापनाने औपचारिक मान्यता दिली आहे.
सिटीझन को-ऑपरेटिव्हच्या ठेवी २,२७७ कोटी रुपये तर कर्ज वाटप २,११२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. राखीव निधी ३८५.५२ कोटी रुपयांवर गेला असून त्यात २९९.७८ कोटी रुपयांचा वैधानिक राखीव निधी समाविष्ट आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक ५४९.६३ कोटी रुपये आहे.
४२ पूर्णतः संगणकीकृत शाखांच्या बळावर सोसायटी सुवर्ण कर्जे, शंभर टक्के तारण असलेली गृहकर्जे, तसेच लघु व मध्यम मुदतीची कर्जे देत आहे. स्थापनेपासून संस्थेने सलग नफा मिळवला असून, सभासदांना आकर्षक लाभांश देत संस्थेचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
सध्या संस्थेकडे १,०१,८४२ सक्रिय सभासद असून, ६६.२७ कोटी रुपयांचे भागभांडवल भरले गेले आहे. बँकिंग, वित्त आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील १० अनुभवी व्यावसायिकांची निवडून आलेली संचालक मंडळ संस्था चालवत असून, २०२० ते २०२५ कालावधीसाठी ते विविध धोरणात्मक विषयांवर नियमित बैठक घेत आहेत.
युनियन बँक ऑफ इंडियाचे माजी उपमहाव्यवस्थापक एम. नरेंद्र कुमार यांच्यासारख्या अनुभवी व्यक्ती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेतृत्व करत आहेत, तर के. वेंकट सुब्बालाह यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कार्यरत आहे. संस्थेने CBS प्रणालीवर आधारित बँकिंग सेवा लागू केल्या असून, सर्व शाखा अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहेत.
सदस्य लाभांसाठी संस्था अपघाती विमा संरक्षण, मृत्यूनंतर सानुग्रह अनुदान, व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देते. कर्मचारी कल्याणासाठी विशेष तरतूद असून, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, पेन्शन, आरोग्य विमा आदी सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेचे ३०० समर्पित कर्मचारी नियमित प्रशिक्षणाद्वारे कौशल्यवृद्धी करत आहेत.