
वाई अर्बन को -ऑप. बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल झालेबद्दल बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी बँकेत पत्रकारांसह सभासद, खातेदारांना पुढीलप्रमाणे माहिती दिली. १०४ वर्ष कार्यरत असलेली वाई अर्बन बँक मधल्या काळात विशेषत: कोविडनंतर वाढलेल्या एनपीएमुळे अडचणीत आली होती. रिझर्व्ह बँकेने कर्ज वाटपावर तसेच ठेववाढीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले होते.
३१ मार्च २०२५ अखेर बँकेने सहकार खात्याच्या विशेष सहकार्यामुळे तसेच थकीत कर्जदारांवर केलेल्या कडक कायदेशीर कारवायांमुळे समाधानकारक वसुली करून एनपीएचे प्रमाणे कमी राखले तसेच बँकेला मागील चार वर्षात प्रथमच नफा मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या वैधानिक लेखा परीक्षणामध्ये बँकेला ऑडिट वर्ग ब प्राप्त झालेला असून बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचा विचार होवून रिझर्व्ह बँकेने बँकेवर लावलेले निर्बंध मोठया प्रमाणात कमी केले आहेत.
रिझर्व्ह बँकेने बँकेच्या व्यवसायावर लावलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे आता बँक चांगल्या कर्जदारांना आवश्यक कर्ज पुरवठा योग्य व्याजदरात करू शकणार आहे. तसेच ठेवीवर देखील व्याजदरात वाढ करणार असून ठेवीदारांना याचा फायदा होणार आहे. बँकेने नुकतेच वैयक्तिक वापराचे वाहन कर्जावरील व्याजदर कमी करून ८.५०%, गृहकर्जावरील व्याजदर कमी करून ९.००% तसेच व्यवसायाकरीता टर्म लोन १२.००% इतक्या माफक व्याजदरात कर्जे उपलब्ध करून दिलेले आहेत , तसेच बँक विशेषत: बचत, चालू खात्यावर कोणतेही कमी शिल्लक चार्जेस आकारत नाही.
बँकेवरील अडचणीच्या काळात सभासद, ग्राहक, ठेवीदार यांनी विश्वास दाखवला, सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेवरील निर्बंध शिथिल झालेले आहेत, त्याबद्दल अध्यक्ष अनिल देव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व खातेदार, ग्राहक, व्यावसायिक, सर्वांनी बँकेच्या सर्व ठेव, कर्ज योजनांचा लाभ घेवून बँकेच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बँकेचे संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, ॲड. बाळकृष्ण पंडीत, रमेश ओसवाल, मकरंद मुळये, महेश राजेमहाडीक, काशीनाथ शेलार, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रितम भुतकर, स्वप्नील जाधव, संचालिका ॲड. सौ. सुनिती गोवित्रीकर, सौ. ज्योती गांधी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे आदि उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेने निर्बंध शिथिल केल्यामुळे बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी व बँकेच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे