
मुंबई :अडचणीत सापडलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेचे सारस्वत सहकारी बँकेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे स्वेच्छेने दिल्याचे सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. रिझर्व्ह बँकेसह दोन्ही बँकांच्या ठेवीदारांच्या मंजुरीनंतर हे विलीनीकरण होईल, असेही ते म्हणाले.
विलीनीकरणानंतर न्यू इंडिया सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदारांचे हित जपणे, मालमत्ता आणि दायित्वांची स्थिरता सुनिश्चित करणे, हा विलीनीकरणाचा प्रमुख उद्देश आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे ठाकूर म्हणाले.
वरिष्ठ व्यवस्थापनाशी संबंधित १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने फेब्रुवारीमध्ये न्यू इंडिया सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आणि प्रशासकाची नियुक्ती केली. गेल्या चार महिन्यांत बँकेची वसूल कार्यक्षमता दुप्पट झाली आहे आणि त्यांचे १,१०० कोटी रुपयांचे कर्ज हे मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रीवर केंद्रित आहे, असे प्रशासक श्रीकांत यांनी यावेळी सांगितले.
ठाकूर म्हणाले की, न्यू इंडिया सहकारी बँकेच्या मालमत्तेचा एक भाग सारस्वत बँकेकडे हस्तांतरित केला जाईल. संपूर्ण विलीनीकरणाचे काम एक ते दोन वर्षांत पूर्ण होईल, तसेच, चालू आर्थिक वर्षात सारस्वत बँकेचा ताळेबंद १ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल. असा उल्लेख त्यांनी केला.
विलीनीकरण प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला काही शेअर्स देणार आहोत. मात्र, गैरव्यवहारात सहभागी असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही, याची खात्री करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला पूर्ण सहकार्य करू. संपूर्ण ऑडिट देखील केले जाईल, असे ठाकूर यांनी पुढे सांगितले. ठेवीदारांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही आणि विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर ते त्यांचे संपूर्ण पैसे काढू शकतील, असे आश्वासन सारस्वत बँकेतर्फे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना देण्यात आले आहे, असे ठाकूर म्हणाले.
सारस्वत बँकेने ४०-४५ नवीन शाखा उघडण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २७ शाखांचा समावेश आहे. आणि त्यांच्या वाढीच्या धोरणाचा भाग म्हणून राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सारस्वत बँकेच्या ३१ मार्च २०२५ पर्यंत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांमध्ये ३१२ शाखा आणि ३०३ एटीएमचे जाळे आहे..
भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेचा अडचणीत सापडलेल्या सहकारी बँकांना नफ्यात आणण्याचा मोठा अनुभव आहे. आम्ही यापूर्वी सात बँकांचे सारस्वत बँकेमध्ये विलीनीकरण केले आहे. ज्यामुळे आठ लाखांहून अधिक ठेवीदार निर्धास्त झाले, असे ठाकूर यांनी सांगितले.