
कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी बँकेचा ४९ वा वर्धापन दिन, सुवर्ण महोत्सव शुभारंभ व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अजित नरके होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रमुख पाहुणे होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले की, कुंभी कासारी बँक सहकार्यातून सहकाराच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल ठरावे. २०४७ च्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकारी बँका व सभासदांनी योगदान द्यावे, असे आवाहन करून श्री. येडगे यांनी कुंभी बँकेचा सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल गौरव केला.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सहकारामुळेच पश्चिम महाराष्ट्र राज्यात आघाडीवर असल्याचे सांगून राज्याला आर्थिक, सामाजिक समृद्धी देण्याचे काम सहकाराने केल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात, ही उल्लेखनीय बाब आहे, पण यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवावेत, आणि ही सुरुवात आहे, आपल्याला पुढे जायचे आहे याची जाणीव ठेवावी. कुंभी कासारी परिसरातील स्पर्धा परीक्षेतील व खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. येडगे यांनी केले.
कुंभी बँक संस्थापक स्व. डी. सी. नरके यांनी साखर कारखाना व बँकेच्या रूपाने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगून कुंभीला देशपातळीवरील उच्च साखर उतारा पुरस्कार मिळाला. ही डी.सी. नरके यांच्या आदर्शावर कार्य करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यांची पोचपावती असल्याचे श्री. येडगे म्हणाले.
बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी, बँकेच्या १३७ कोटी ठेवी, ८० कोटी कर्जवाटप आणि २५० कोटी रुपयांची उलाढाल असल्याचे सांगितले. भविष्यात सहकारात स्पर्धा असली तरी सहकारातील पतसंस्था, सहकारी बँका, शेड्युल्ड बँकांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सुवर्ण महोत्सवी वर्षात आयएमपीएस, क्यूआरकोड या सुविधासह तीन नवीन शाखा, ७५ वर्षावरील सभासद, माजी संचालक, निवृत्त कर्मचारी प्रबोधन व्याख्यान असे कार्यक्रम घेणारअसल्याचे श्री. नरके यांनी सांगितले.
तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा. एस. टी. जाधव यांनी, सभासदांनी बहुमताचा आदर करायला शिकले पाहिजे, संस्थेविषयी निष्ठा, शिस्तीचे पालन आणि संस्था ही सभासदांचे घर असते त्याची बदनामी होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी चेतन चव्हाण,ललिता बाटे, यांच्यासह केंद्रीय, राज्य लोकसेवा आयोग, दहावी, बारावी, तसेच अन्य स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला संचालक बाबुराव पाटील, हिंदुराव मगदूम, के.डी. पाटील, प्रकाश देसाई, प्रा. एस.पी. चौगले, पंडित वरुटे, आनंदराव माने, प्रदीप नाळे, प्रकाश काटकर, दत्तात्रय पाटील, रणजित पाटील, रंगराव पाटील, दाजी पाटील, मारुती चौगले, कृष्णात वरुटे, दत्ता कांबळे, सर्जेराव शिंदे, आनंदा पाटील, संभाजी कुंभार, श्रीकांत पाटील, रेखा पाटील, कुंभी कारखाना, कुंभी बँक, यशवंत बँकेचे संचालक, सभासद, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.