
कुडित्रे : येथील कुंभी-कासारी सहकारी बँकेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शेतकरी सांस्कृतिक भवनात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बँकेचे अध्यक्ष अजित नरके अध्यक्षस्थानी होते, तर आमदार चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सभासदांना भेटवस्तूंबरोबर वर्षभर विविध उपक्रम राबवून शैक्षणिक, कृषी, सामाजिक प्रबोधन केले जाणार आहे. याचबरोबर यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याचे अजित नरके यांनी सांगितले.
अध्यक्ष नरके यांनी बँकेकडे अहवाल सालात १२७ कोटींच्या ठेवी तर ८० कोटींचे कर्ज वाटप केल्याचे सांगितले. बँकेला ४ कोटी १३ लाख ढोबळ नफा, तर १ कोटी ४९ लाख निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. भागभांडवल ४ कोटी रुपये आहे. बँकेकडे सर्वसामान्य ठेवीदारांच्या पाच लाखांच्या आतील ८२ टक्के ठेवी असल्याने पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिल्याचे सांगितले. यावेळी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. चर्चेत दत्तात्रय पाटील, सुभाना निकम, बळवंत पाटील यांनी सहभाग घेतला. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. राऊत यांनी केले. सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.