
वाई: येथील जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे अध्यक्ष श्री.बळीराम जगताप यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. यावेळी बँकेचे संस्थापक-संचालक श्री.सुरेशराव कोरडे, संचालक- जगन्नाथ कदम, सौ.सुनंदा फरांदे, शेखर फरांदे, महेंद्र जमदाडे, निळकंठ मोरे, रमेश बुलुंगे, तज्ञ संचालक- सीए विनय लोखंडे, विठ्ठल कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रुपाली बुलुंगे व बँकेचे सन्माननीय सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर अहवाल सालात मृत्यू पावलेले विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बँक सभासद व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बँक सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष श्री. बळीराम जगताप यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. बँकेच्या प्रगतीमध्ये आजी-माजी संचालक, सभासद, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी या सर्वांचे सहकार्य झालेले असून पुढेही सहकार्य करणेचे आवाहन श्री. जगताप यांनी केले. बँकेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात “ब” वर्ग प्राप्त झाला, असे सांगितले. श्री. जगताप पुढे म्हणाले की, बँकेने कायदेशीर मार्गाने कर्ज वसुली करत निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण २.३०% इतके अत्यल्प राखण्यात यश मिळविले आहे. बँक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे आणि तत्पर ग्राहक सेवा देत असल्यामुळे बँकेच्या व्यवहारात दिवसेंदिवस वाढ होत असून शाखेमध्ये ग्राहकांसाठी QR कोड सुविधा, एटीएम कार्ड, रूपे कार्ड, सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा, पंतप्रधान जीवन विमा योजना, ऑनलाईन ७/१२ सुविधा, एनईएफटी व आरटीजीएस सुविधा, सर्व प्रकारच्या करांचा भरणा, फोन पे द्वारे खातेवर रक्कम जमा करणे, मोबाइलवरून पिग्मि कलेक्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. सर्व सभासदांनी बँकेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांचा लाभ घेत बँक व्यवसायवाढीसाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
बँकेचे संस्थापक-संचालक सुरेशराव कोरडे यांनी आपल्या भाषणात, सर्व आजी-माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचा बँकेच्या प्रगतीत मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच बँक नवीन सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब करत सभासदांना विविध सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. सर्व सभासदांनी व्यवसाय वाढीसाठी आणि कर्ज वसुलीसाठी सहकार्य करून बँकेच्या विकासाचे भागीदार होण्याचे आवाहन केले.
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रुपाली बुलुंगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभा कामकाजामध्ये बँक सभासद संतोष पिसाळ, अमोल इथापे, कैलास जमदाडे, राहुल खरात, रवि बोडके, विनय कोरडे, बाळकृष्ण राजपुरे, शशिकांत कोरडे, सागर जमदाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत बँक कामकाज, बँक व्यवसायवाढ आणि कर्जप्रणाली याबाबत आपली मते मांडली. बँक सभासद अरुणा यादव-भुजबळ यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहाय्यक संचालकपदी नियुक्ती झालेबाबत त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. श्री. पिसाळ यांनी यावेळी संचालक जामीनदार असलेल्या कर्जाबाबत योग्य ती कार्यवाही करत सर्वांना एकसारखे समान नियम लावावेत. सभासदांना लाभांश देणेबाबत विचार होवून सभासदांना जास्तीत-जास्त सवलती उपलब्ध करून देण्याबाबत मा.संचालक मंडळ आणि व्यवस्थापनास सुचविले.
अध्यक्ष बळीराम जगताप, संस्थापक-संचालक सुरेशराव कोरडे आणि बँकेचे मा.अंतर्गत लेखापरीक्षक सीए श्री. सत्याजीराव भोसले यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सभेत सन २०२४-२५ वर्षातील ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व इतर सर्व विषयांना उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजूरी दिली.
प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेचे पॅनल वकील ॲड.जी.एम.फरांदे, ॲड.सुमंत पवार, पत्रकार प्रशांत गुजर, माजी संचालक बाळासाहेब सपकाळ, शब्बीरखान पठाण, राम चव्हाण, दत्तात्रय सपकाळ, शामराव बनकर, डॉ. विकास फरांदे, प्रवीण ननावरे, बँक सभासद श्री. दीपक ननावरे, आण्णासाहेब फरांदे, नितिन इथापे, हरी पवार, हिंदुराव जायकर, संजय कदम, कांतिलाल ओसवाल, वसंतराव ननावरे, संतोष राजपुरे, दत्तात्रय राजपुरे, दत्तात्रय रासकर, संदीप कोरडे, रूपेश शिंदे, चंद्रकांत बुलुंगे, जब्बार मोमीन, विशाल बोराटे, दिलीप बोराटे, महादेव रासकर, संतोष चव्हाण, विनय कोरडे, विशाल फरांदे, तानाजी रासकर, सुभाष गायकवाड, सौ.कल्पना कोरडे, सौ. भाग्यश्री जमदाडे, सौ. रूपाली कुदळे, सुधीर फरांदे, शिवाजीराव पिसाळ, धनंजय गवळी, सुभाष पिसाळ, आत्माराम कुदळे, सुरेश कुदळे, प्रभाकर जमदाडे, रमेश जगताप, संदीप गाढवे, मनोज सुळके, शिरीष खरात, सुरेश जायगुडे, संजय जाधव, तेजस कुदळे व बँकेचे असंख्य सभासद उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रशासनअधिकारी विक्रम कोरडे यांनी केले. संस्थापक-संचालक सुरेशराव कोरडे यांनी सर्वाचे आभार मानले.