
नॅशनल अर्बन को-ऑपरेटीव्ह फायनान्स् अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) व कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकांकरिता एक दिवसीय प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. 'सहकार पाठशाला' या उपक्रमाचे उद्घाटन कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे, एनयुसीएफडीसीचे (NUCFDC) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. पद्मभूषण बहादुरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उपक्रमातील पहिल्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात करण्यात आले होते.
एनयुसीएफडीसी (NUCFDC) ही सहकारी बँकांसाठी स्थापन केलेली अंब्रेला ऑर्गनाईझेशन असून नागरी सहकारी बँकांसाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञान संबंधित सुविधा पुरवण्यासाठी तसेच विविध वरिष्ठ पदांवरील कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्वाचे काम 'सहकार पाठशाला' या उपक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. एनयुसीएफडीसी (NUCFDC) ही भारतातील केंद्रपातळीवरील संस्था असून नजीकच्या काळात देशपातळीवर नागरी सहकारी बँकांकरिता अशा अनेक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येणार आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष श्री. शरद गांगल यांच्या हस्ते सहकार पाठशालेच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मचे (ऑनलाईन) उद्घाटन करण्यात आले. सदर सुविधेमुळे कोणत्याही वेळेला कोठूनही प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. सध्या ही सुविधा इंग्रजी भाषेत उपलब्ध असून लवकरच ती इतर स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कॉसमॉस बँकेच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या राज्यातील नागरी सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच संचालक उपस्थित होते. केवायसी, फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, ट्रेझरी मॅनेजमेंट या विषयांवर आजच्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यात आले.