रिझर्व्ह बँकेमध्ये 'युवा तज्ज्ञ' पदांसाठी भरती, दरमहा १.५ लाखांचे स्टायपेंड!

एआय, सायबर सुरक्षा आणि क्वांटम टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करण्याची तरुणांना मोठी संधी. ६ जुलै २०२६ पूर्वी करा ऑनलाइन अर्ज; वयोमर्यादा, पात्रता आणि नियम जाणून घ्या.
RBI Young Professional Recruitment 2026
केवळ नोकरी नाही, तर भविष्यातील यशाची गुरुकिल्ली! रिझर्व्ह बँक देणार तरुणांना १.५ लाखांच्या स्टायपेंडसह कामाचा अनुभव
Published on

मुंबई: सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल आणि आर्थिक युगात देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरबीआयच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासाठी चार अत्याधुनिक क्षेत्रांतील 'युवा तज्ज्ञ' (Young Professionals - YP) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरमहा १,५०,००० रुपये निश्चित विद्यावेतनाची (Stipend) घोषणा करणाऱ्या या भरतीकडे केवळ एक 'नोकरी' म्हणून न पाहता, तरुण वर्गासाठी जागतिक स्तरावर चमकण्याची एक 'लॉन्चपॅड' म्हणून पाहिले जात आहे. आधुनिक बँकिंग चे हे नवीन रूप 'multidisciplinary' झाले असून पदासाठीची चारही क्षेत्रे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रीतीने बँकिंग वर परीणाम करणारी आहेत.

  • या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रिझर्व्ह बँकेने निवडलेली ज्ञान क्षेत्रे (Specialized Knowledge Areas). बँक आता केवळ आर्थिक धोरणे किंवा लेखापरीक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होत आहे. एकूण १२ जागांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये खालील चार अत्याधुनिक क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे:

  • १. कृत्रिम प्रज्ञा (Artificial Intelligence - AI): वित्तीय क्षेत्रात एआयचा वापर करून बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित आणि वेगवान करणे.

  • २. क्वांटम तंत्रज्ञान (Quantum Technology): आगामी काळातील अत्यंत वेगवान आणि प्रगत संगणकीय प्रणालीवर काम करणे.

  • ३. सायबर सुरक्षा (Cyber Security): दिवसेंदिवस वाढणाऱ्या डिजिटल आर्थिक फसवणुकीला आणि सायबर हल्ल्यांना आळा घालण्यासाठी मजबूत तटबंदी उभारणे.

  • ४. हवामान बदलाचे धोके (Climate Change Risks): हवामान बदलाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकिंग क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचे धोरणात्मक विश्लेषण करणे.

रिझर्व्ह बँकेने या पदांसाठी जितके तगडे मानधन ठेवले आहे, तितकेच कामाचे नियमही व्यावसायिक (Professional) आणि कडक ठेवले आहेत.

  • निश्चित मानधन: उमेदवाराला दरमहा १.५ लाख रुपये दिले जातील (यावर नियमानुसार कर कपात लागू असेल). या व्यतिरिक्त इतर कोणताही भत्ता (DA, HRA, Medical) किंवा आर्थिक लाभ मिळणार नाही.

  • कामाचे स्वरूप व शिस्त: हा पूर्णवेळ करार असल्याने, या कालावधीत उमेदवाराला कोणताही इतर व्यवसाय, नोकरी किंवा अर्धवेळ काम (Part-time job) करता येणार नाही. नियमित कार्यालयीन वेळेनुसार काम करावे लागेल आणि जादा कामासाठी कोणतेही अतिरिक्त मानधन मिळणार नाही.

  • रजांचे नियम: वर्षाला १५ दिवसांची रजा प्रो-रेटा (महिन्याच्या कामाच्या) आधारावर मिळेल. विशेष म्हणजे, चालू वर्षातील शिल्लक रजा पुढील वर्षात वर्ग (Carry forward) करता येणार नाही.

  • अनुपस्थितीवर कडक कारवाई: कोणत्याही वैध कारणाशिवाय सलग ८ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्यास, रिझर्व्ह बँक उमेदवाराचा सेवा करार त्वरित रद्द करू शकते.

  • करार कालावधी: सुरुवातीला हा करार ३ वर्षांचा असेल, जो उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारावर जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

पात्रता निकष:

  • वयोमर्यादा: अर्ज करण्याची अंतिम मुदत म्हणजेच ६ जुलै २०२६ रोजी, उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (तरुणांना प्राधान्य देण्याच्या हेतूने ही वयोमर्यादा निश्चित केली आहे).

  • राष्ट्रीयत्व: अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

  • निवडीनंतरची प्रक्रिया: निवड झालेल्या उमेदवारांना जॉइनिंगपूर्वी वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate) आणि पोलीस पडताळणी अहवाल (Police Verification Report) सादर करणे बंधनकारक असेल.

अर्ज करण्याची पद्धत (Step-by-Step Application Process)

इच्छुक उमेदवारांनी कोणतीही चूक न करता खालीलप्रमाणे अर्ज सादर करावा:

  • पायरी १: रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अधिसूचनेत दिलेला विहित अर्ज डाउनलोड करा आणि तो अचूक भरा.

  • पायरी २: सर्व कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये एकत्र करा:

    1. अद्ययावत जीवनचरित्र (Updated CV)

    2. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (Educational Certificates)

    3. स्वारस्य विवरण (Statement of Interest - तुम्हाला या पदावर का काम करायचे आहे?)

    4. शैक्षणिक किंवा धोरणात्मक लेखनाचा नमुना (Academic/Policy-oriented Writing Sample)

    5. एखाद्या नामांकित किंवा व्यावसायिक व्यक्तीकडून घेतलेले शिफारस पत्र (Reference Letter)

  • पायरी ३: हा अर्ज आणि सोबतची कागदपत्रे yphrmdco@rbi.org.in या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवा.

  • पायरी ४: ईमेल पाठवताना 'Subject Line' अत्यंत महत्त्वाची आहे. ती खालील फॉरमॅटमध्येच असावी: "वायपी अर्ज [पद कोड] [उमेदवाराचे नाव]"

विशेष नोंद: जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल, तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ईमेलद्वारे स्वतंत्र अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ जुलै २०२६

  • देशातील विविध क्षेत्रातील 'बेस्ट  टॅलेंट' आकर्षित करू शकणा-या रिझर्व बँकेच्या ही भावी भरती भारतातील भावी बँकिंग ची दिशा ही स्पष्ट करणारी आहे

Banco News
www.banco.news