देशातील सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक व सहकारी क्रेडिट संस्था यांचे सर्वोच्च प्रतिनिधित्व करणारी संस्था -नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड (नॅफकब) ने आपल्या नवी दिल्ली येथील कार्यालयासाठी पूर्णवेळ कराराधिष्ठित मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी अर्ज मागविले आहेत.
नॅफकबने प्रसिद्द्धीस दिलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार भारतीय नागरिक असावा व त्याला सहकारी बँकिंग व क्रेडिट सोसायट्या क्षेत्रात व्यावसायिक कौशल्य, व्यापक अनुभव आणि नेतृत्वगुण असावेत.
उमेदवाराचे वय ३० जून २०२५ रोजी ५५ ते ६५ वर्षे दरम्यान असावे, तथापि पात्र व गुणवान उमेदवारांना वयामध्ये शिथिलता दिली जाऊ शकते. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे, तसेच त्याच्याकडे CAIIB प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
सहकारी बँकिंग किंवा सहकारी क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक असून, त्यापैकी किमान ५ वर्षे वरिष्ठ व्यवस्थापन किंवा धोरणनिर्मितीच्या पदावर अनुभव असावा. बँकिंग पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पात्रता, अनुभव व निवडीयोग्यतेनुसार मानधन निश्चित करण्यात येईल. अंतिम निवड नॅफकबच्या निर्णयावर आधारित असेल व तो निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले तपशीलवार बायोडेटा व पासपोर्ट साईज छायाचित्र अध्यक्ष, नॅफकब, यांच्यापर्यंत "मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज" अशा शीर्षकासह बंद पाकिटात रजिस्टर्ड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे पाठवावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅफकबच्या अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घ्यावा.