

नोव्हेंबर महिन्यात भारतीय रुपयाचे भविष्य कमकुवत राहिले आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चितता, तेल आयातदारांकडून वाढलेली डॉलरची मागणी आणि परदेशी निधीचा सतत बाहेर जाणारा प्रवाह यामुळे रुपया ८९ च्या जवळ जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
४ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर जाण्यापासून बचाव करण्यासाठी NDF (Non-Deliverable Forward) मार्केटमध्ये हस्तक्षेप केला. या हालचालीमुळे काही प्रमाणात स्थिरता आली असली तरी, चलन बाजारात रुपयाचे भविष्य अजूनही कमकुवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
HDFC सिक्युरिटीजचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, “नोव्हेंबरमध्ये USD-INR दर 88.30 ते 89.25 च्या श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. परदेशी निधीचा प्रवाह, RBI ची हस्तक्षेप रणनीती, व्यापार संतुलन डेटा आणि आशियाई चलनांची हालचाल हे या महिन्यातील प्रमुख घटक ठरतील.”
फिनरेक्स ट्रेझरी अँडव्हायझर्सचे अनिल कुमार भन्साळी यांच्या मते, “डॉलरची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे आणि आयात अजूनही निर्यातीपेक्षा वरचढ आहे. तेल कंपन्या, संरक्षण व्यवहार आणि कर्ज परतफेडीमुळे डॉलरची मागणी स्थिर राहते.” त्यांनी असेही नमूद केले की, RBI सध्या 88.80 च्या पातळीवर स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र डॉलरची मागणी वाढल्यास रुपया त्या पातळीच्या पलीकडे जाऊ शकतो.
IFA ग्लोबलचे अभिषेक गोएंका म्हणाले की, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारी बँकांद्वारे बाजारात सक्रिय आहे. फॉरवर्ड मार्केटमध्ये हस्तक्षेपामुळे थोडासा आधार मिळाला आहे, पण मजबूत अमेरिकन डॉलरमुळे रुपया अजूनही दबावाखाली आहे.”
सध्या गुंतवणूकदार आणि आयातदार दोघेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या पुढील हालचालीकडे बारकाईने पाहत आहेत. येत्या काही दिवसांत रुपया विक्रमी नीचांकी पातळीच्या जवळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.