
डॉ. धनंजय देशपांडे यांनी "स्मार्ट सिटी" प्रणालीचा गैरफायदा घेत तयार केलेल्या एका नव्या सायबर फसवणूक सापळ्याचे सविस्तर विवेचन केले आहे. आजकाल शहरी भागांमध्ये प्रशासनाने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामागचा हेतू म्हणजे कोणताही चालक सिग्नल तोडू नये, चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस करू नये किंवा चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये. हा आहे. असे काही घडले, तर कॅमेरा आपला फोटो काढतो आणि तो डेटा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जातो, यानंतर संबंधित व्यक्तीला चलान पाठवले जाते. पण, याच यंत्रणेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी एक नवा सायबर फ्रॉड तयार केला आहे. हा फसवणुकीचा सापळा कसा कार्यान्वित होतो, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.
फसवणुकीची सुरुवात – एका साध्या मेसेजने होते.
आपल्याला व्हॉट्सअॅप किंवा टेक्स्ट मेसेज येतो. त्या फाईलचे नाव असते "Traffic Challan 500 rupees.apk"
हो! ही एक एपीके (APK) फाईल असते जी अँड्रॉइड मोबाइलमध्ये अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाते. लोक असे मेसेज पाहून विचार करू लागतात: “कदाचित मी कुठे सिग्नल तोडला असेल का?” “आपल्याकडून काही चूक झाली असेल बहुतेक.“ छोटा मुद्दा असेल, दुर्लक्ष करूया.” याप्रकारे दुर्लक्ष करणं मोठी चूक ठरते. तुम्ही जशी ही एपीके फाईल क्लिक करता, तसे तुमचे संपूर्ण मोबाइल डिव्हाइस सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते. कारण त्या फाईलमध्ये मालवेअर (म्हणजे हॅकिंग सॉफ्टवेअर) असते.
पुढे काय घडते?
भामटा तुमचा कॉल लॉग, कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी, मेसेजेस, आणि इतर खाजगी माहिती मिळवतो.
तुमच्या मोबाईलमधून तुमच्या सर्व संपर्कांना तोच फसवा मेसेज पाठवला जातो.
अनेकजण विचार न करता त्या फाईलवर क्लिक करतात आणि त्यांचेही फोन हॅक होतात.
काय नुकसान होऊ शकते?
तुमचे प्रायव्हेट फोटो मॉर्फ करून ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जाऊ शकतात.
बँक खात्यांची माहिती चोरून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.
पर्सनल डेटा चोरीला जाऊ शकतो. ज्यामुळे वैयक्तिक आयुष्य धोक्यात येते.
हा फसवा मेसेज कसा ओळखाल?
मेसेज पाठवणाऱ्याचा DP (डिस्प्ले पिक्चर) "पोलीस" लोगो दाखवतो — नीळसर रंगात, जे अधिकृतसारखे दिसते.
पण खाली एक मोबाईल नंबर असतो — यावरून लगेच समजावे, हा मेसेज फसवा आहे.
कारण पोलिसांकडून कधीच वैयक्तिक मोबाईल नंबरवरून चालान पाठवले जात नाही.
अधिकृत चालान हे सरकारी पोर्टलवरून पाठवले जातात.
आपण काय करायला हवे?
अशा कोणत्याही APK फाईलवर क्लिक करू नका.
असा मेसेज आल्यास लगेच नजिकच्या पोलीस ठाण्यात जा.
ट्रॅफिक हवालदार यांना तुमचा गाडी नंबर सांगा आणि विचारणा करा:
माझ्या नावावर चलान निघाले आहे का?
पोलिस तुमच्या सहाय्यासाठी आहेत, फसवणूक करण्यासाठी नाहीत.
थोडक्यात
खरे आणि बनावट यातला फरक समजून घ्या.
सायबर भामट्यांकडून सावध राहा.
जागरूक नागरिक व्हा . कारण माहितीचं सामर्थ्यच आपल खरी शस्त्रं आहे.
सावध रहा, सुरक्षित रहा!