राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिका अर्जासाठी ५ मे पर्यंत मुदतवाढ

सहकार विभागाची मोठी बातमी: सुधारित वेळापत्रक जाहीर - जुन्या आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या इच्छुक लेखापरीक्षकांना अर्ज करण्याची संधी
Maharashtra Government Rules
महाराष्ट्र शासनाचे सुधारित आदेश जाहीरगुगल
Published on

पुणे: महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या सन २०२६-२०२८ या कालावधीसाठी राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिका (Panel of Auditors) तयार करण्याच्या प्रक्रियेला सहकार विभागाने मुदतवाढ दिली आहे. तांत्रिक बिघाड आणि लेखापरीक्षकांच्या मागणीची दखल घेत आता ५ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी यासंदर्भातील सुधारित आदेश जारी केले आहेत.

वेबसाईटमधील बिघाडामुळे निर्णयामध्ये बदल

यापूर्वी अर्ज भरण्यासाठी ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज अपलोड करताना जुन्या आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. संकेतस्थळ वारंवार बंद ठेवावे लागल्याने सनदी लेखापाल (CA) आणि प्रमाणित लेखापरीक्षक संघटनांनी सहकार आयुक्तांकडे मुदतवाढीची मागणी केली होती.

मागील २०२४-२०२६ या कालावधीसाठी साधारण १८,००० अर्ज प्राप्त झाले होते. यावर्षी आतापर्यंत ८,५०० हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून, येत्या काळात हा आकडा १०,००० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. वाढती संख्या आणि तांत्रिक अडथळे पाहता प्रशासनाने संपूर्ण छाननी प्रक्रियेचा कालावधी वाढवला आहे.

Maharashtra Government Rules
सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नामतालिकेला मुदतवाढ – राज्य शासनाचा निर्णय

असा असेल नवीन सुधारित कार्यक्रम:

  • अर्ज भरण्याची मुदत: नवीन ऑनलाईन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आता ५ मे २०२६ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

  • जिल्हा स्तरीय छाननी: प्राप्त झालेल्या अर्जांची जिल्हा स्तरावरील समितीमार्फत छाननी ६ मे ते २० मे २०२६ या दरम्यान केली जाईल.

  • आयुक्त कार्यालय तपासणी: जिल्हा स्तरावरील प्रक्रियेनंतर सहकार आयुक्त कार्यालय स्तरावर २१ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी होईल.

  • तक्रार निवारण: अर्जाबाबत काही हरकती किंवा तक्रारी असल्यास त्यासाठी ५ जून ते १४ जून २०२६ हा काळ निश्चित करण्यात आला आहे.

  • अंतिम निवड: तक्रार निवारणानंतर समितीने शिफारस केलेल्या अर्जांची पुन्हा आयुक्त स्तरावर छाननी होऊन ३० जून २०२६ रोजी पात्र लेखापरीक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

लेखापरीक्षकांना आवाहन

सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, १ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकातील इतर सर्व अटी व शर्ती कायम असून केवळ तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. सध्या पॅनेलवर असलेल्या आणि नव्याने येऊ इच्छिणाऱ्या सर्व लेखापरीक्षकांनी सुधारित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहकार आयुक्तांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Attachment
PDF
सन २०२६-२०२८ या कालावधीच्या लेखापरीक्षक नामिकेसंदर्भातील ऑनलाईन अर्ज मागणी, छाननी या संदर्भातील सुधारित कृती कार्यक्रम
Preview
Banco News
www.banco.news