कंबोडिया ट्रिप प्लॅन करताय? खिशात फक्त मोबाईल अन् 'UPI' पुरेसा!

रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; भारत आणि कंबोडिया दरम्यान पेमेंट प्रणाली जोडली त्यामुळे दोन्ही देशांतील पर्यटक व व्यवसायास होणार मोठा फायदा
UPI in Cambodia: Scan QR Code
भारतीय प्रवाशांसाठी कंबोडियात 'KHQR' पेमेंट सेवा लाईव्ह; कॅशलेस प्रवासाचा नवा अनुभव.
Published on

नॅशनल डेस्क: जर तुम्ही आगामी काळात कंबोडियाला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला परदेशी चलन (फॉरेन करन्सी) किंवा खिशात नोटांचे बंडल घेऊन फिरण्याची अजिबात गरज नाही. आपल्या देशात चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉलपर्यंत ज्या पद्धतीने आपण मोबाईलवर 'QR Code' स्कॅन करून पेमेंट करतो, अगदी तशाच सोप्या पद्धतीने आता कंबोडियामध्येही खरेदी करता येणार आहे. भारत व कंबोडिया यांच्यातील व्यापार हा ४१० दशलक्ष डॉलर्स असून भारत औषधे, मशिनरी, कपडे, वाहने व वाहनांचे सुटे भाग व केमिकल्स प्रामुख्याने निर्यात करतो व क्रूड व रिफाईनड पाम तेल, रबर,ॲल्युमिनियम याची आयात करतो. या व्यापारास देखील या सुलभ पेमेंट प्रणालीमुळे बढावा मिळेल.

भारताची लोकप्रिय UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणाली आता अधिकृतपणे कंबोडियात सुरू झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि नॅशनल बँक ऑफ कंबोडिया यांच्या पुढाकाराने ही महत्त्वाची सेवा २ जून २०२६ पासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक सुविधेमुळे सामान्य पर्यटकांना नेमका काय फायदा होणार आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

४५ लाखांहून अधिक दुकानांवर पेमेंट होणार

कंबोडियामध्ये गेल्यानंतर भारतीय प्रवाशांना तिथल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा दुकानांमध्ये पैसे देताना खूप सोपे होणार आहे. तिथल्या 'KHQR' (कंबोडियाचे राष्ट्रीय QR मानक) सक्षम असलेल्या तब्बल ४५ लाखांहून अधिक व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना भारतीय नागरिक आपल्या मोबाईलमधील नेहमीच्या UPI ॲप्सद्वारे (जसे की Google Pay, PhonePe, भीम ॲप) थेट स्कॅन करून पेमेंट करू शकतील.

UPI in Cambodia: Scan QR Code
परदेशी पर्यटकांसाठी ‘UPI One World’ वॉलेट सुरू, बँक खात्याशिवायही पेमेंट शक्य

नोटांची कटकट संपली: परदेशी चलनाच्या नोटा सांभाळणे किंवा त्या चोरीला जाण्याची भीती आता पूर्णपणे मिटेल.

कार्डचे एक्स्ट्रा चार्जेस वाचणार: आंतरराष्ट्रीय क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरताना लागणारे छुपे चार्जेस आणि जास्त बँक कमिशन यापासून सुटका होईल.

सुरक्षित आणि तात्काळ व्यवहार: तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यातून समोरच्या व्यापाऱ्याला सुरक्षितपणे आणि अगदी काही सेकंदांत ट्रान्सफर होतील.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा भारत आणि कंबोडियामधील डिजिटल भागीदारीचा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प भारताची 'एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड' (NIPL) आणि कंबोडियाची 'अकलेडा बँक पीएलसी' (Acleda Bank Plc.) यांनी मिळून पूर्ण केला आहे.

सध्याच्या पहिल्या टप्प्यात केवळ भारतीय पर्यटकांना कंबोडियात पेमेंट करता येईल. यानंतर सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात, कंबोडियाचे नागरिक जेव्हा भारतात येतील, तेव्हा त्यांनाही भारतात UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा दिली जाईल.

Attachment
PDF
Launch of Payment Systems’ Connectivity Between India and Cambodia
Preview
Banco News
www.banco.news