SBI डेटा लीक प्रकरण: नवी मुंबईत एफआयआर दाखल

ग्राहकांची वैयक्तिक माहिती धोक्यात; बनावट कॉल्स आणि ओटीपी फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन.
SBI data breach 2026 - SBI cyber attack Navi Mumbai
एसबीआयला मोठा फटका! ३.७५ लाख बँक रेकॉर्ड्स आणि ग्राहक फाईल्स हॅक
Published on: 

नवी मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्लोबल आयटी सेंटरला मोठा सायबर फटका बसला आहे. नवी मुंबई येथील बँकेच्या केंद्रीकृत कॉम्प्युटर सर्व्हरमध्ये सायबर गुन्हेगारांनी घुसखोरी करून तब्बल ३.७५ लाख बँक रेकॉर्ड्स आणि ग्राहकांची अत्यंत संवेदनशील माहिती चोरल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात अधिकृत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही सायबर घुसखोरी १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घडली. 'सिरीसिम' (Ceresium) नावाच्या हॅकर गटाने एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरच्या सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला. या कालावधीत हॅकर्सनी बँकेच्या विविध ॲप्लिकेशन्सशी संबंधित सुमारे ३२ सीएसव्ही (CSV) फाइल्स, ज्यांमध्ये जवळपास ३.७५ लाख नोंदी होत्या, त्या चोरल्या.

याशिवाय वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती (PII) असलेल्या जेएसओएन (JSON) फॉरमॅटमधील फाईल्स आणि २,७२१ पीडीएफ (PDF) फाईल्स देखील या हल्ल्यात प्रभावित झाल्या. विशेष म्हणजे, हा चोरीस गेलेला डेटा नंतर डार्क वेबवरही दिसून आला होता.

हॅक झालेल्या फाईल्समध्ये काय आहे?

हॅकर्सनी चोरलेल्या फाईल्समध्ये खालील संवेदनशील माहितीचा समावेश आहे:

  • एसबीआय ग्राहकांची वैयक्तिक माहिती

  • कर्ज अर्जांची नोंद

  • नवीन बँक खाते उघडण्याचे अर्ज

  • ग्राहकांचे संपर्क क्रमांक आणि निवासी पत्ते

तज्ज्ञांच्या मते, या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार भविष्यात आर्थिक फसवणूक आणि फिशिंग (Phishing) हल्ले घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बँकेचा दावा आणि सायबर तज्ज्ञांचे इशारे

डार्क वेबवर डेटा दिसून आल्यानंतर एसबीआयच्या अंतर्गत पथकाने तातडीने तपास सुरू केला होता. लीक झालेली सामग्री नंतर डार्क वेबवरून काढून टाकण्यात आली असून, प्राथमिक अंतर्गत चौकशीत डेटाच्या गैरवापराचा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असा दावा बँकेने केला आहे. मात्र, गांभीर्य लक्षात घेऊन बँकेने पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली.

दुसरीकडे, सायबर कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी ग्राहकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, डार्क वेबवरून डेटा काढून टाकल्यामुळे त्याच्या प्रती इतरत्र अस्तित्वात नाहीत, अशी हमी मिळत नाही. हॅकर्सनी ही माहिती आधीच इतरांना विकली असण्याची दाट शक्यता आहे.

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा

येत्या काही दिवसांत सायबर गुन्हेगार बँक अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांशी संपर्क साधू शकतात.

  • खाते क्रमांक, केवायसी अपडेट्स, कर्ज अर्ज किंवा व्यवहारांचा संदर्भ देऊन ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

  • अशा कोणत्याही बनावट कॉल्स, मेसेजेस किंवा ईमेल्सला बळी पडू नका.

  • बँक कधीही फोनवर किंवा मेसेजद्वारे ओटीपी (OTP), पासवर्ड किंवा पिन नंबर विचारत नाही. त्यामुळे कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नका.

पोलिसांचा तपास सुरू

सीबीडी-बेलापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) चोरी आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. हॅकर्सनी वापरलेला आयपी ॲड्रेस, सर्व्हर लॉग्स आणि डार्क वेबवरील डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील डेटा चोरीमुळे बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.