म्युल बँक खात्यांद्वारे लाखोंची सायबर फसवणूक

१५ दिवसांत म्युल अकाउंटचा दुसरा गुन्हा उघडकीस; कोरेगावच्या दोघांवर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल.
Mule Bank Account Fraud News Satara
Published on

सातारा: बँक खाती भाड्याने देऊन सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्या आणि 'म्युल अकाउंट'द्वारे ३ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर सातारा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान संशयितांनी महिला पोलिसाची गचंडी धरून, धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा प्रकारही समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या धैर्यामुळे आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.

श्रीकांत राजाराम मतकर (वय ३४, रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) आणि सलमान सुगीर शेख (वय ३०, रा. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिला पोलिसाने तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

मार्च २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत संशयितांनी स्वतःची बँक खाती सायबर भामट्यांना वापरण्यासाठी दिल्याचे तपासात उघडकीस आले. देशभरातील नागरिकांची सायबर फसवणूक करून लुटलेली रक्कम या 'म्युल' खात्यांवर जमा केली जात होती. त्यानंतर ही रक्कम रोख स्वरूपात काढून, इतर यूपीआय व्यवहारांद्वारे किंवा वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून फसवणुकीच्या रकमेचा मूळ स्त्रोत लपवण्याचा प्रयत्न केला गेला. या माध्यमातून तब्बल ३ लाख ८८ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Mule Bank Account Fraud News Satara
तब्बल २४ लाखांहून अधिक 'म्युल खाती' संशयाच्या भोवऱ्यात!

संशयितांच्या खात्यांचा संशयास्पद वापर होत असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, कारवाईदरम्यान चिडलेल्या संशयितांनी "तू मला ओळखत नाहीस, तुला दाखवतो मी कोण आहे, तुझे कुटुंब ठेवणार नाही," अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर, महिला पोलिसाची गचंडी धरून त्यांना धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला; मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडले.

संशयित सलमान सुगीर शेख (३०, रा. कोरेगाव) याच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. सातारा जिल्ह्यात सध्या स्वतःची बँक खाती भाड्याने देण्याचे किंवा पैशांच्या आमिषाला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अवघ्या १५ दिवसांत म्युल अकाउंट संदर्भातील हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. या प्रकरणातील संशयित श्रीकांत राजाराम मतकर (वय ३४, रा. तांदुळवाडी ता. कोरेगाव) याला पोलिसांनी अटक केली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध सायबर पोलिस घेत आहेत.

Banco News
www.banco.news