फक्त एक WhatsApp मेसेज आणि ₹१.५५ कोटी गायब!

टाटा मोटर्सच्या डिलरशिपची हायटेक फसवणूक; भामट्याची नवी चाल पाहून पोलिसही चक्रावले. ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने वाचावी अशी डोळे उघडणारी बातमी.
WhatsApp DP Fraud - Online financial fraud Maharashtra
WhatsApp वर 'Fake CEO'चा मेसेज; सांगलीत कंपनीला दीड कोटींचा फटका!
Published on

सांगली : वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी आता थेट बड्या कंपन्यांना आपले लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे. सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावरील टाटा मोटर्सची अधिकृत कार विक्री आणि सर्व्हिस सेंटर असलेल्या 'जे. व्ही. मोटर्स' (JV Motors) या नामांकित कंपनीची एका भामट्याने तब्बल १ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा (CEO) फोटो व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून, तसेच त्यांच्याच नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकावरून मेसेज पाठवून हा सावज टिपण्यात आला.

याप्रकरणी कंपनीचे अकाउंट व्यवस्थापक आमीर निजाम जमनावाले (वय ३४, रा. गुरुवार पेठ, मिरज) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अनोळखी सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जे. व्ही. मोटर्सची दुसरी शाखा कोल्हापूर येथे 'युनिटी मोटर्स' या नावाने कार्यरत आहे, तर मुख्य शाखा पुणे येथे आहे. कंपनीच्या अंतर्गत धोरणानुसार, कंपनीचे 'सीईओ' आर्थिक व्यवहारांबाबतचे आदेश किंवा बँक खात्यांचे तपशील थेट 'व्हॉट्सॲप' मेसेजद्वारे अकाउंट्स विभागाला पाठवत असतात. या मेसेजच्या आधारेच जे. व्ही. मोटर्समधून संबंधित खात्यावर रकमा वर्ग केल्या जातात. कंपनीच्या याच अंतर्गत व्यवहाराची संपूर्ण माहिती असलेल्या एका चतुर भामट्याने याचा गैरफायदा उठवला.

WhatsApp DP Fraud - Online financial fraud Maharashtra
Whatsapp हॅक! ओटीपी न देता खात्यातून लाखोंची फसवणूक

हा संपूर्ण प्रकार १ आणि २ जुलै दरम्यान घडला. भामट्याने हुबेहूब कंपनीच्या 'सीईओ' यांच्यासारखाच फोटो (DP) एका मोबाईल क्रमांकावर ठेवला. हा क्रमांक 'युनिटी मोटर्स' कोल्हापूरचे अकाउंट व्यवस्थापक प्रशांत पाटील यांच्याकडे आधीपासूनच 'सीईओ' यांच्या नावाने सेव्ह होता. प्राथमिक तपासानुसार, भामट्याने मूळ नंबर बदलून किंवा स्पूफिंग करून मेसेज पाठवल्याचा संशय आहे.

झालेला व्यवहार:

  • पहिला मेसेज: दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर अनुक्रमे ५७ लाख रुपये आणि ९८ लाख ५० हजार रुपये पाठवण्याचे आदेश आले.

  • अकाउंटंटची खात्री: डीपीवर सीईओंचा फोटो असल्याने आणि नंबरही त्यांच्याच नावाने सेव्ह असल्याने व्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी यावर पूर्ण विश्वास ठेवला.

  • रक्कम वर्ग: पाटील यांनी हे मेसेज सांगलीचे आर्थिक व्यवहार पाहणारे आमीर जमनावाले यांना पाठवले. जमनावाले यांनी तात्काळ कंपनीच्या फेडरल बँकेच्या खात्यावरून बंधन बँक (प्रधाननगर शाखा) च्या खात्यावर ५७ लाख आणि येस बँक (कर्नूल, आंध्र प्रदेश शाखा) च्या खात्यावर ९८ लाख ५० हजार रुपये आरटीजीएस (RTGS) द्वारे वर्ग केले.

दोन दिवसांत दीड कोटींहून अधिक रक्कम हडपल्यानंतरही भामट्याची हाव सुटली नव्हती. त्याने प्रशांत पाटील यांना आणखी रक्कम पाठवण्याबाबत पुन्हा मेसेज केला. मात्र, जे. व्ही. मोटर्सच्या बँक खात्यातील रक्कम संपल्यामुळे पाटील यांनी पुढील व्यवहारासाठी थेट 'सीईओ' यांना फोन लावला.

जेव्हा पाटील यांनी रकमेबाबत विचारणा केली, तेव्हा सीईओ यांनी "मी असा कोणताही मेसेज किंवा बँक खाते क्रमांक पाठवला नाही" असे स्पष्ट केले. हे ऐकताच कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि फसवणुकीचा हा मोठा प्रकार उघडकीस आला. शनिवार, ४ जुलै रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित बँकांमध्ये धाव घेतली, मात्र तोपर्यंत भामट्याने दोन्ही खात्यांमधून सर्व रक्कम अन्य खात्यांमध्ये वळवून फसवणुकीचा डाव यशस्वी केला होता.

सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सायबर सेलच्या मदतीने ज्या बँक खात्यांवर पैसे वर्ग झाले, त्यांचे तपशील आणि संशयास्पद मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक तपासात भामट्याने हुबेहूब नंबर आणि फोटोचा वापर करून हा फसवणुकीचा सापळा रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

WhatsApp DP Fraud - Online financial fraud Maharashtra
CEO चा 'फेक' मेसेज अन् १० कोटींचा सायबर झटका!

या घटनेने व्यावसायिक जगताला एक मोठा धडा दिला आहे. केवळ व्हॉट्सॲप मेसेज, फोटो किंवा ओळखीचा नंबर पाहून लाखो-करोडो रुपयांचे व्यवहार करणे धोक्याचे होऊ शकते, हे यावरून दिसते. कितीही अंतर्गत धोरण असले, तरी मोठ्या रकमांचे व्यवहार करताना 'थ्रेट इंटेलिजन्स' किंवा किमान फोन करून 'व्हॉईस कन्फर्मेशन' (क्रॉस-वेरिफिकेशन) करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा तंत्रज्ञानाचा गैरवापर करून असे भामटे कंपन्यांना एका झटक्यात रस्त्यावर आणू शकतात.

Banco News
www.banco.news