

सांगली: बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून एका निवृत्त वृद्धाची गोपनीय माहिती मिळवत सायबर भामट्याने त्यांचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँकेतील मुदत ठेव (FD) आणि बचत खात्यातील तब्बल ६ लाख १७ हजार रुपयांची रक्कम परस्पर लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमेश त्रिंबक श्रोत्री (वय ६८, रा. राधाकृष्ण वसाहत, डॉ. आंबेडकर रस्ता, सांगली) यांनी सांगली सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रोत्री हे निवृत्त असून सध्या घरात एकटेच राहतात. त्यांचे 'इंडसइंड बँकेत' (IndusInd Bank) खाते आहे. त्यांनी या खात्यावर सात मुदत ठेवी (FD) केल्या होत्या. तसेच त्यांच्या बचत खात्यामध्ये (Saving Account) ४३ हजार रुपये शिल्लक होते.
१४ मे रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास श्रोत्री यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरील व्यक्तीने हिंदी भाषेतून संवाद साधत आपण इंडसइंड बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. "तुमचे नेट बँकिंग सुरू करायचे आहे, त्यासाठी माहिती हवी आहे," असे सांगून भामट्याने श्रोत्री यांच्याकडून त्यांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक आणि डेबिट कार्डचा नंबर मागून घेतला. श्रोत्री यांनी बँकेतूनच फोन आल्याचे समजून सर्व गोपनीय माहिती दिली.
श्रोत्री यांनी माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल हॅक झाला. मोबाईलचा ताबा मिळवताच सायबर भामट्याने त्यांच्या मुदत ठेवी (FD) मधून सुरुवातीला ७९ हजार रुपये, त्यानंतर १ लाख ४८ हजार रुपये आणि ३ लाख ९० हजार रुपये असे टप्प्याटप्प्याने एकूण ६ लाख १७ हजार रुपये कापून अन्य खात्यात वर्ग केले. बचत खात्यातील रकमेवरही डल्ला मारण्यात आला.
रात्रीच्या सुमारास बँक खात्यातून रक्कम परस्पर हडप झाल्याचे निदर्शनास येताच श्रोत्री यांना मोठा धक्का बसला. तोपर्यंत रात्रीच्या वेळी बँक बंद झाली होती.
श्रोत्री यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तातडीने इंडसइंड बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सायबर क्राईमच्या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवून सांगली सायबर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष धाव घेतली. याप्रकरणी सांगली सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कोणतीही बँक कधीही फोनवर ग्राहकांकडून त्यांचा बँक खाते क्रमांक, डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, जन्मतारीख किंवा ओटीपी (OTP) मागत नाही. नेट बँकिंग किंवा केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या नावाखाली असे फोन आल्यास तातडीने फोन कट करावा आणि आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा.