तुमच्या पाकिटात बनावट नोट तर नाही ना? रिझर्व्ह बॅंकेने केला धक्कादायक खुलासा!

५०० रु च्या १.४१ लाख नोटा नकली; बनावट नोटांच्या बाजारात चालू वर्षात मोठी वाढ.
rbi fake note report - Marathi News
भाजीवाला असो वा मोठा व्यावसायिक, 'या' बातमीने उडेल सगळ्यांचीच झोप; बनावट नोटांचे नवे जाळे उघड!
Published on

पुणे: 'बनावट नोटा म्हटल्या की त्या फक्त ५०० किंवा आधीच्या १०००-२००० अशा मोठ्या मूल्याच्याच असतील', हा सर्वसामान्यांचा समज आता भाबडा ठरणार आहे. कारण, देशात आता अगदी १०, २० आणि ५० रुपयांच्या छोट्या चलनी नोटांच्याही बनावट प्रती बाजारात फिरत असल्याचा धक्कादायक खुलासा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ताज्या अहवालातून झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अहवालानुसार, बँकिंग प्रणालीमध्ये तब्बल २.२९ लाखांपेक्षा अधिक बनावट नोटा सापडल्या असून, त्यातील निम्म्याहून अधिक नोटा एकट्या ५०० रुपयांच्या आहेत.

  • रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बँकिंग यंत्रणेत येणाऱ्या बनावट नोटांचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढतच चालले आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांचा आढावा घेतला, तर एकूण ६ लाख ७० हजार ३२१ बनावट नोटा यंत्रणेने पकडल्या आहेत.

    • आर्थिक वर्ष २०२३-२४: २,२२,६३९ नोटा

    • आर्थिक वर्ष २०२४-२५: २,१७,३९६ नोटा

    • आर्थिक वर्ष २०२५-२६: २,२९,७४६ नोटा (चालू वर्षात मोठी वाढ)

  • काही वर्षांपूर्वी चलनातून बाद झालेल्या आणि रिझर्व्ह बँकेकडे जमा होत असलेल्या २००० रुपयांच्या नोटांमध्येही अद्याप बनावट नोटा आढळून येत आहेत.

  • बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळ्यांचा मुख्य रोख ५०० रुपयांच्या नोटांवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२५-२६ या एकाच वर्षात सापडलेल्या एकूण २,२९,७४६ बनावट नोटांपैकी तब्बल १ लाख ४१ हजार ९०७ नोटा या ५०० रुपयांच्या होत्या. या बनावट नोटांचे एकूण मूल्य ७ कोटी ९ लाख ५३ हजार ५०० रुपये इतके प्रचंड आहे.

  • गेल्या तीन वर्षांतील ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा प्रवास पाहिला तर तो थक्क करणारा आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८५,७११ बनावट नोटा आढळल्या होत्या, ही संख्या २०२४-२५ मध्ये १ लाख १७ हजार ७२२ वर पोहोचली, तर २०२५-२६ मध्ये यात आणखी वाढ होऊन ती १ लाख ४१ हजार ९०७ वर गेली. या तीन वर्षांत ५०० च्या एकूण ३ लाख ४५ हजार ३४० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, त्यांचे एकूण मूल्य १७ कोटी २६ लाख ७० हजार रुपये इतके होते.

rbi fake note report - Marathi News
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट; सरकारने स्पष्ट केली स्थिती
  • मोठ्या नोटांवर तपास यंत्रणांची नजर असल्याने आता बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्यांनी आपला मोर्चा लहान नोटाकडे वळवला आहे. सर्वसामान्य नागरिक १०, २० किंवा ५० रुपयांची नोट घेताना ती तपासून पाहत नाहीत, याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जात आहे.

    • ५० रुपयांच्या नोटा: गेल्या ३ वर्षांत अनुक्रमे १५,३६६, १२,०१५ आणि १०,२७४ अशा एकूण ३७ हजार ६२८ बनावट नोटा आढळल्या (एकूण मूल्य: १८ लाख ८१ हजार ४०० रुपये).

    • २० रुपयांच्या नोटा: गेल्या ३ वर्षांत अनुक्रमे २९७, २५३ आणि ३७३ अशा एकूण ९२३ बनावट नोटा बाजारात आल्या, ज्यांचे मूल्य १८,४६० रुपये होते.

    • १० रुपयांच्या नोटा: अगदी दहा रुपयांच्या नोटाही सुटलेल्या नाहीत. ३ वर्षांत अनुक्रमे २३५, १५९ आणि १३३ अशा एकूण ५४५ बनावट नोटा यंत्रणेने जप्त केल्या असून त्यांचे मूल्य ५,४५० रुपये होते.

रिझर्व्ह बँकेचा हा अहवाल केवळ आकडेवारी नसून, देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या समांतर काळ्या बाजाराचा इशारा आहे. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले असले, तरी किरकोळ बाजारात अजूनही रोख व्यवहारांवर मोठा भर आहे. त्यातच १० आणि ५० रुपयांसारख्या छोट्या नोटाही बनावट येत असल्याने भाजी विक्रेते, छोटे दुकानदार आणि सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

नागरिकांनी पैशांचे व्यवहार करताना, विशेषतः ५०० रुपयांची नोट घेताना रिझर्व्ह बँकेने सांगितलेली सुरक्षा वैशिष्ट्ये (जसे की वॉटरमार्क, सुरक्षा धागा) तपासून पाहणे गरजेचे आहे. 'छोटी नोट आहे म्हणून ती खरीच असेल' या भ्रमात न राहता प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज या अहवालातून व्यक्त होत आहे.

Banco News
www.banco.news