

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अर्थशास्त्र, बँकिंग आणि आर्थिक विषयांमध्ये मूळ लेखन आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 'हिंदी भाषेत अर्थशास्त्र/बँकिंग/आर्थिक विषयांवर मूळ पुस्तके लिहिण्याची योजना (वर्ष २०२५-२६)' सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निवडक पुस्तकांच्या लेखकांना प्रत्येकी १,२५,००० (एक लाख पंचवीस हजार) रुपयांचे तीन रोख पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.
बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील संकल्पना भारतीय भाषांमध्ये अधिक सोप्या आणि व्यापक पद्धतीने पोहोचवणे, तसेच या विषयांवर मूळ संशोधन साहित्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मान्यता दिलेल्या भारतातील सर्व विद्यापीठांमधील कार्यरत आणि सेवानिवृत्त प्राध्यापक (सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक इत्यादींसह) या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत.
पुरस्काराचे स्वरूप: अर्थशास्त्र, बँकिंग आणि वित्त विषयांवर मूळ हिंदीत लिहिलेल्या सर्वोत्तम ३ पुस्तकांची निवड केली जाईल.
पुरस्कार रक्कम: प्रत्येक विजेत्या पुस्तकाला ₹१,२५,०००/- चे रोख पारितोषिक दिले जाईल.
योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती परिपत्रकाच्या संलग्नकात (Annex) देण्यात आल्या आहेत.
या योजनेत सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या पात्र प्राध्यापक आणि संशोधकांनी आपले अर्ज व पुस्तकांच्या प्रति विहित नमुन्यात (Prescribed Proforma) खालील पत्यावर सादर करणे आवश्यक आहे:
प्रति,
मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager),
भारतीय रिझर्व्ह बँक, राजभाषा विभाग, केंद्रीय कार्यालय, ८ वा मजला, सी-९, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६ (संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत)
बँकिंग आणि अर्थशास्त्रासारखे गुंतागुंतीचे विषय प्रादेशिक व राष्ट्रभाषेत सहज उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. रिझर्व्ह बँकेच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक वर्तुळातील प्राध्यापक आणि तज्ज्ञांना मूळ संशोधनासाठी मोठे प्रोत्साहन मिळेल, तसेच भारतीय भाषांमधील आर्थिक साहित्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.