रिझर्व्ह बँकेचा बँकांना 'डिजिटल' दणका; पेमेंट सिस्टीममध्ये होणार मोठे बदल!

कोअर बँकिंगमध्ये रिअल-टाइम बदल आणि ४५ दिवसांत तक्रार निवारणाची अट; लहान बँकांचा खर्च आणि अनुपालनाचा भार वाढणार.
RBI guidelines for Urban Cooperative Banks 2026 - RBI new rules 2026
बँकिंग व्यवहारांचे नियम बदलणार! नवीन खात्याचे UPI राहणार बंद, तर मोठ्या व्यवहारांसाठी लागणार 'या' व्यक्तीची परवानगी
Published on: 

मुंबई: डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कंबर कसली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन मसुदा नियमांमुळे देशातील बँकांना आपल्या कोअर बँकिंग आणि पेमेंट प्रणालीमध्ये मोठे तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रावर अनुपालनाचा (Compliance) मोठा भार पडणार असून, तांत्रिक पायाभूत सुविधांवर होणारा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेने प्रस्तावित केलेले हे नवीन नियम प्रामुख्याने दोन टप्प्यांत लागू केले जाणार आहेत. यातील बँकेच्या निष्काळजीपणाशी संबंधित नियम १ जानेवारी २०२७ पासून, तर इतर तांत्रिक सुरक्षा उपाय १ जुलै २०२७ पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

बँकांना प्रणालीत करावे लागणारे ५ मोठे तांत्रिक बदल:

नवीन खात्यांचे डिजिटल व्यवहार सुरुवातीला बंद राहणार: बँकेत नवीन खाते उघडल्यानंतर यूपीआय (UPI), नेट बँकिंग यांसारखे सर्व डिजिटल पेमेंट चॅनेल सुरुवातीला 'डिफॉल्ट' स्वरूपात बंद ठेवावे लागतील. ग्राहकाने स्पष्ट संमती दिल्यानंतरच ते सुरू करता येतील.

तात्काळ व्यवहार थांबवण्यासाठी 'स्टॉप स्विच': फसवणुकीचा संशय आल्यास ग्राहकांना एका क्लिकवर सर्व आउटगोइंग डिजिटल व्यवहार आणि नवीन यूपीआय नोंदणी थांबवता यावी, यासाठी बँकांना आपल्या ॲप, वेबसाईट, एटीएम आणि शाखांमध्ये 'इमर्जन्सी स्टॉप स्विच' द्यावा लागेल. यासाठी कोअर बँकिंग प्रणालीचे रिअल-टाइम इंटिग्रेशन करावे लागणार आहे.

'विश्वासू व्यक्ती' (Trusted Person) यंत्रणा: ग्राहकाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार (यूपीआय आणि व्यापारी पेमेंट वगळता) पूर्ण होण्यापूर्वी, ग्राहकाने नोंदवलेल्या 'विश्वासू व्यक्तीची' एका तासाच्या आत मंजुरी घेणे अनिवार्य असेल. ही नवीन यंत्रणा बँकांना विकसित करावी लागेल.

व्यवहार नियंत्रणाचे सूक्ष्म अधिकार: प्रत्येक पेमेंट चॅनेलसाठी स्वतंत्र मर्यादा, लाभार्थी मर्यादा (Beneficiary Limits) आणि ठराविक वेळेसाठी चॅनेल बंद ठेवण्याचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे लागतील.

बँकांची जबाबदारी आणि 'निष्काळजीपणा'ची नवी व्याख्या: जर बँकेच्या प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला, सुरक्षा उपायांमध्ये त्रुटी राहिली किंवा रिझर्व्ह बँकेने सांगितलेली नियंत्रणे उपलब्ध करून दिली गेली नाहीत, तर त्याला थेट 'बँकेचा निष्काळजीपणा' मानले जाईल. अशा स्थितीत ग्राहकाच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई बँकेलाच करावी लागेल.

बँकिंग क्षेत्रासमोर वाढणार आव्हाने:

या नवीन नियमांची अंमलबजावणी करताना बँकांना तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर कसरत करावी लागणार आहे. कोअर बँकिंग सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप्स आणि एटीएम नेटवर्कमध्ये हे रिअल-टाइम बदल करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मोठ्या खासगी आणि सरकारी बँकांच्या तुलनेत लहान, सहकारी आणि ग्रामीण बँकांसाठी हा खर्च पेलणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते.

तसेच, फसवणुकीच्या तक्रारींमध्ये ग्राहक दोषी नसल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी बँकांवर असेल. त्यामुळे बँकांना प्रत्येक व्यवहाराचा, क्लिकचा आणि अलर्टचा सेकंदा-सेकंदाचा अचूक तांत्रिक डेटा (Audit Trail) जतन करून ठेवावा लागेल. शिवाय, देशांतर्गत फसवणुकीच्या तक्रारी निकाली काढण्याची मुदत ४५ दिवसांवर आणल्याने बँकांना आपली तपासणी यंत्रणा अधिक वेगवान करावी लागणार आहे.

एकंदरीत, रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे सर्वसामान्य बँक ग्राहकांना मोठे सुरक्षा कवच मिळणार असले, तरी बँकांसाठी मात्र तांत्रिक सुधारणा आणि नियम पालनाची मोठी परीक्षा ठरणार आहे.