

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या पैशांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला असून सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योगसमूहांपर्यंत कर्ज घेण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील 'बिगर-अन्न कर्ज' पुरवठ्यात वार्षिक १४.३ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने ४१ प्रमुख बँकांकडून घेतलेल्या माहितीनुसार, उद्योगांच्या कर्जवृद्धीने मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी हा दर केवळ ७.५ टक्के होता, जो आता १३.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः पायाभूत सुविधा, रसायने, अभियांत्रिकी आणि कापड उद्योगातून कर्जाची सर्वाधिक मागणी आली आहे. व्यावसायिक रिअल इस्टेट आणि NBFC क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे ही वाढ झाल्याचे दिसून येते.
बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची आकडेवारी 'पर्सनल लोन' विभागातून समोर आली आहे. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे.
पर्सनल लोन: या विभागात १५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
वाहन आणि गोल्ड लोन: गृहकर्ज स्थिर असले तरी कार आणि सोन्यावर आधारित कर्जांची मागणी लक्षणीय रितीने वाढली आहे.
शेती: कृषी क्षेत्रातील कर्जपुरवठ्यातही १२.३ टक्क्यांची सुधारणा झाली आहे.
कर्ज घेण्याचे वाढते प्रमाण हे लोकांची खरेदी करण्याची क्षमता आणि उद्योजकांचा गुंतवणुकीवरील विश्वास दर्शवते. हा अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत असला तरी, पर्सनल लोनमधील अवास्तव वाढ ही धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे कर्जदारांनी आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.