

पालघर: डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे, याचे एक धक्कादायक उदाहरण पालघरमध्ये समोर आले आहे. थेट जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांचे बनावट व्हॉट्सॲप खाते (Fake WhatsApp Account) तयार करून एका नागरिकाला ५० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन सायबर चोरांना पोलिसांनी झारखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत गुन्ह्यातील १०० टक्के रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
ही घटना १७ मे रोजी उघडकीस आली. वागळसार (पालघर) येथील रहिवासी विनीतकुमार मुंशीलाल मीणा (वय २८) यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर संदेश (Message) आला. या क्रमांकाच्या प्रोफाइल पिक्चरवर (DP) पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांचा फोटो लावण्यात आला होता. समोरील व्यक्तीने स्वतः जिल्हाधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी मीणा यांचा विश्वास संपादन केला. 'एका बँक खात्यावर ५० हजार रुपयांची तातडीची मदत हवी आहे,' असे सांगून आरोपीने मीणा यांना पैसे पाठवण्यास प्रवृत्त केले. जिल्हाधिकाऱ्यांकडूनच मदत मागितली जात असल्याच्या समजुतीने मीणा यांनी कोणतीही शंका न घेता तातडीने ५० हजार रुपये संबंधित बँक खात्यावर वर्ग केले.
पैसे ट्रान्सफर केल्यानंतर काही वेळातच आपली फसवणूक झाल्याची जाणीव विनीतकुमार मीणा यांना झाली. त्यांनी वेळ न घालवता थेट पालघर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analysis) आधार घेतला. ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते, त्या खात्याची सखोल माहिती काढण्यात आली. सायबर पोलिसांनी तांत्रिक धागेदोरे जोडत आरोपींचे लोकेशन शोधून काढले, जे थेट झारखंडमध्ये दाखवत होते.
पालघर पोलिसांच्या पथकाने थेट झारखंड गाठले आणि धनबाद येथून दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. बलवंतकुमार कमलप्रसाद मंडल (वय २६, रा. मनोरमनगर, धनबाद, झारखंड)
२. राजकुमार दुखन रवानी (वय २२, रा. बँक कॉलनी, धनबाद, झारखंड)
सामान्यतः सायबर गुन्ह्यांमध्ये गेलेली रक्कम परत मिळणे कठीण असते. मात्र, पालघर सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे या गुन्ह्यातील फसवणूक झालेली संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम (१००%) हस्तगत करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रोहित खोत, राजेश वाघ तसेच पोलीस हवालदार आणि अंमलदारांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही बड्या अधिकाऱ्याचा, नेत्याचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा फोटो व्हॉट्सॲप प्रोफाइलला असेल आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी होत असेल, तर आधी संबंधित व्यक्तीशी थेट फोनवर संपर्क साधून खात्री करा. कोणत्याही अनोळखी क्रमांकावर पैसे पाठवून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा.