'फ्री' चित्रपट डाउनलोडच्या नादात गमावले ३६.६६ लाख रुपये!

तुमच्या मोबाईलमध्येही 'ती' लिंक आलीये का? जाणून घ्या विक्रोळीत नेमकं काय घडलं.
Free movie download link fraud news
सावधान! 'फ्री' मूव्ही डाऊनलोड करताय? विक्रोळीत एका लिंकने घातला ३६ लाखांचा दणका
Published on

मुंबई (विक्रोळी): सोशल मीडियावरून मोफत चित्रपट (Free Movie Download) डाउनलोड करण्याचा मोह एका व्यक्तीला भलताच महागात पडला आहे. विक्रोळी येथील एका नागरिकाच्या मोबाईलमध्ये अनधिकृत अ‍ॅपच्या माध्यमातून घुसखोरी करत सायबर भामट्यांनी तब्बल ३६.६६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकी काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराला सोशल मीडियावर मोफत चित्रपट डाउनलोड करण्याची एक आकर्षक लिंक दिसली. 'फ्री' सिनेमा पाहण्याच्या मोहापोटी त्याने क्षणाचाही विचार न करता त्या लिंकवर क्लिक केले आणि संबंधित फाईल/अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड केले.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फाईल डाउनलोड होताच त्यातील मालवेअरच्या (Malware) साह्याने सायबर भामट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईलचा पूर्ण ताबा मिळवला. मोबाईलमधील अत्यंत संवेदनशील माहिती आणि बँक खात्याशी संबंधित तपशील हॅकर्सच्या हाती गेले.

Free movie download link fraud news
Whatsapp हॅक! ओटीपी न देता खात्यातून लाखोंची फसवणूक

मोबाईलचा ताबा मिळताच भामट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे काढण्यास सुरुवात केली. काही वेळातच खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे संदेश (SMS) मोबाईलवर येऊ लागल्याने तक्रारदाराच्या पायाखालची जमीन सरकली. काय घडतेय हे लक्षात येईपर्यंत भामट्यांनी खात्यातील ३६ लाख ६६ हजार रुपये लंपास केले होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून भामट्यांचा शोध सुरू आहे.

आजकाल सोशल मीडिया किंवा टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर 'फ्री मूव्ही', 'मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन' किंवा 'मोठ्या डिस्काउंट'च्या नावाखाली अनेक बनावट लिंक्स पसरवल्या जातात. अशा अज्ञात लिंक्सवर क्लिक करून डाउनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समध्ये गुप्त मालवेअर असतात, जे तुमच्या मोबाईलमधील पासवर्ड, ओटीपी आणि बँकिंग डिटेल्स थेट सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचवतात.

सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?

  • कोणत्याही अनधिकृत किंवा अज्ञात लिंकवरून अ‍ॅप/साईटवर जाऊन कंटेंट डाउनलोड करू नका.

  • केवळ अधिकृत स्टोअर्स (Google Play Store किंवा Apple App Store) वरूनच अ‍ॅप्स डाउनलोड करा.

  • अशी फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

Banco News
www.banco.news