

मुंबई: ऑनलाईन व्यवहारांच्या जगात सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या वापरून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. मात्र, आता चक्क 'ओटीपी' (OTP) शेअर न करताही बँक खात्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील खार परिसरातून समोर आला आहे. या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यावसायिकांच्या खात्यातून तब्बल ४ लाख ६६ हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खार परिसरात राहणारे ७४ वर्षीय व्यावसायिक गोरधन खेमचंद थवानी आणि हॉटेल व्यावसायिक मनोज मानसिंग गाने हे या सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. दोन्ही तक्रारदारांनी दावा केला आहे की, त्यांनी कोणालाही आपला ओटीपी दिला नाही किंवा बँकेची कोणतीही गुप्त माहिती कोणासोबतही शेअर केली नव्हती. तरीही, त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले.
गोरधन थवानी (वय ७४) यांचे मरिनलाईन्स येथे इलेक्ट्रिक शॉप आहे. ३० जून रोजी सकाळी १० वाजता ते रिक्षाची वाट पाहत असताना त्यांच्या मोबाईलवर काही अज्ञात मेसेज आले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर अचानक ओटीपी येण्यास सुरुवात झाली. काही समजण्याआधीच त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख २६ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर झाल्याचे त्यांना समजले. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचे 'रिमोट ॲक्सेस' मिळवून ही फसवणूक केल्याचा संशय आहे.
दुसरी घटना हॉटेल व्यावसायिक मनोज गाने यांच्यासोबत घडली. २७ जून रोजी त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. मात्र, समोरची व्यक्ती वायफळ बडबड करत असल्याने त्यांनी तो नंबर ब्लॉक केला. दरम्यान, त्यांना काही ओटीपी मॅसेज आले. धक्कादायक म्हणजे, त्यानंतर अवघ्या ५१ मिनिटांत त्यांच्या खात्यातून ७० हजार १४० रुपये गायब झाले.
या दोन्ही घटनांनंतर पीडित व्यावसायिकांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीसह (IPC) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) संबंधित कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, गुन्हेगार आता केवळ ओटीपीच्या आधारेच नाही, तर 'रिमोट ॲक्सेस' (Remote Access) देणाऱ्या ॲप्सद्वारे (उदा. AnyDesk, TeamViewer) मोबाईलचा ताबा घेतात. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद ॲप डाऊनलोड करणे टाळावे. मोबाईलवर सतत ओटीपी येत असल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून खाते तात्पुरते बंद (Freeze) करावे, असा सल्ला दिला जात आहे.
सायबर गुन्हेगारीपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तुमची वैयक्तिक आणि बँक माहिती कोणासोबतही शेअर करू नका. सतर्क राहा, सुरक्षित राहा!