

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. चा सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीचा १२ वा ऐतिहासिक वेतन करार बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाला. या कराराअंतर्गत सेवकांच्या वेतनात १६ टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली असून, 'कुटुंब सुरक्षा कवच योजना' आणि नवीन भत्त्यांसह अनेक महत्त्वपूर्ण सोई-सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. आनंदराव अडसुळ आणि बँकेच्या एकूण ६ कर्मचारी संघटनांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
मागील वेतन करारामध्ये कर्मचाऱ्यांना १२ टक्के वेतनवाढ देण्यात आली होती, त्यामध्ये वाढ करून यंदाच्या करारामध्ये १६ टक्के इतकी लक्षणीय वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. यामुळे सेवकांच्या पगारामध्ये सरासरी १५,५०० रुपयांची वाढ होणार आहे. या करारामधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा कालावधीत मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबासाठी बँकेने 'कुटुंब सुरक्षा कवच योजना' सुरू केली आहे. या योजनेनुसार सेवा काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या उर्वरित सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी २ महिन्यांचा पगार त्याच्या कुटुंबाला दिला जाणार आहे. तसेच, मृत कर्मचाऱ्याच्या घरातील पात्र व्यक्तीला बँकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी वयोमर्यादा ३५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली असून, त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये २० टक्के अधिक भारांकन (वेटेज) देण्यात आले आहे.
याशिवाय, करारामध्ये प्रथमच मेट्रोपोलिटन शहरांसाठी ५,५०० रुपयांपर्यंत सिटी अलाउन्स मंजूर करण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या घरकर्ज व इतर कर्ज सुविधांच्या मर्यादांमध्येही भरघोस वाढ करण्यात आली आहे. बँकेने नुकतेच सेवकांना १४.२५ टक्के बोनस देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे.
या ऐतिहासिक कराराप्रसंगी बोलताना को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री. आनंदराव अडसुळ यांनी बँकेची प्रगती आणि कर्मचाऱ्यांची प्रगती या परस्पर पूरक बाबी असाव्यात असे नमूद केले. बँकेच्या प्रगतीमध्ये सेवक संघटनांचा रचनात्मक सहभाग असावा, असे सांगत त्यांनी स्पर्धात्मक युगात कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता, उत्पादकता आणि ग्राहक सेवेचा दर्जा सुधारणे तसेच डिजिटल बँकिंग प्रणाली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन केले.
बँकेचे प्रशासक श्री. विद्याधर अनास्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सेवकांचे पगार आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, प्रशासनाने सेवकांना भरघोस वाढ दिल्यानंतर सेवकांनी देखील त्यांच्याकडून अपेक्षित असणारी जबाबदारी पार पाडण्यात कसूर करू नये आणि बँकेच्या प्रगतीमध्ये योगदान देताना कोणतीही कुचराई अथवा तडजोड करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतिहासात प्रथमच प्रशासनाने दिलेल्या १६ टक्के पगारवाढीबद्दल आणि जाहीर केलेल्या सोई-सुविधांबद्दल सर्व कर्मचारी संघटनांनी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, बँकेची दि. ३१ मार्च २०२६ अखेरची आर्थिक स्थितीही भक्कम राहिली आहे. या आकडेवारीनुसार बँकेचा सीआरएआर (CRAR) १८.५० टक्के असून नेटवर्थ ५,७४७ कोटी रुपये आणि स्वनिधी ८,१७५ कोटी रुपये इतका आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ५६,२४९ कोटी रुपयांवर पोहोचला असून नेट एन.पी.ए. १.६४ टक्के इतका मर्यादित राहिला आहे, तर प्रती कर्मचारी व्यवहार ६८ कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे.